विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेले पुणे मागच्या काही काळापासून आयटीहब आणि निवृत्तांचे शहर म्हणूनही ओळखले जाते. या ओळखीमध्ये आणखी एक भर पडली असून पुणे हे देशातील उत्तम शासन असलेले शहर असल्याचे एका अहवालातून नुकतेच समोर आले आहे. या स्पर्धेमध्ये २० राज्यांमधील २३ शहरांनी सहभाग घेतला होता. त्यात पुण्याने पहिला क्रमांक मिळवला आहे. ‘इंडियाज सिटी सिस्टीम फॉर २०१७’ असे या सर्वेक्षणाचे नाव असून पुण्याने १० पैकी ५.१ गुण मिळवत इतर शहरांना मागे टाकले आहे.
यामध्ये दिल्लीला ४.४ तर मुंबईला ४.२ गुण मिळाले आहेत. त्यामागोमाग कलकत्ता, थिरुवनंतपुरम, भुवनेश्वर, सुरत हे त्यामागोमाग आहेत. शहरातील एकूण शासकीय कामकाजाचा यामध्ये प्रामुख्याने विचार करण्यात आला होता. एकूण ८९ प्रश्नांवरुन हे गुण देण्यात आले आहेत. त्यातही कायदे, धोरणे आणि माहिती अधिकार यांचा विचार कऱण्यात आला आहे. विशेष म्हणजे आयटीहब म्हणून ओळख असलेले बंगळुरु यामध्ये सगळ्यात खालच्या क्रमांकावर असल्याचे समोर आले आहे.
पालिकेतील अनेक व्यवहारांचे डिजिटायझेशन करण्यात आल्याने नागरिकांकडून त्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पुण्याचे आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले. याअंतर्गत परदेशातील मेट्रो शहरांचेही सर्वेक्षण करण्यात आले आहे, त्यात दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग, यूकेतील लंडन आणि अमेरिकेतील न्यूयॉर्क या शहरांना चांगली रँक मिळाली आहे. यामध्ये पायाभूत सोयीसुविधा, इतर सेवा, राजकीय नेतृत्व, आर्थिक नियोजन आणि इतरही अनेक बाबींमध्ये पारदर्शकता आणि नागरिकांचा सहभाग असल्याचे हे सर्वेक्षण कऱणाऱ्या स्वयंसेवी संस्थेने नोंदविले आहे.
