जॉर्जियामधल्या एका महिलेनं चुकून आपले जवळपास ६० लाख किंमतीचे दागिने कचऱ्यात फेकले आहेत. सफाई कर्मचाऱ्यांना जवळपास ३ तास १० टन कचऱ्याचा ढिगारा उपसावा लागला. अखेर तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांना महिलेची कचऱ्याची बॅग ढिगाऱ्याखाली सापडली आहे.
घन कचरा विभागाला या महिलेनं फोन करून आपले किंमती दागिने हरवले असल्याची माहिती दिली. महिलेचा फोन आल्यानंतर या विभागातले सर्वच कर्मचारी कामाला लागले. दररोज शेकडो टन कचरा डम्पिंग ग्राऊंडवर गोळा होतो. त्यामुळे हा कचरा उपसून त्यातून नेमके दागिने शोधणं सफाई कर्मचाऱ्यांना जड जात होतं. अखेर त्यांनी शक्कल लढवत १० टन कचऱ्यातून तिचे दागिने शोधून काढले. पाच कर्मचारी तीन तास दागिने शोधण्याचा अथक प्रयत्न करत होते.
आपले दागिने एका काळ्या प्लॅस्टिकच्या पिशवीत आहे एवढीच माहिती तिनं विभागाला दिली होती. त्यामुळे एवढ्या मोठ्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून दागिने शोधणं कर्मचाऱ्यापुढेचं मोठं आव्हान होतं पण त्यांनी हे आव्हान स्विकारून गवताच्या गंजीतून सुई शोधल्यासारखे हे दागिनं शोधून काढले आहेत.
