दहावीच्या विद्यार्थिनीला परीक्षेत मदत करण्याच्या मोबदल्यात एका मुख्याध्यापकाने तिच्यावर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. डमी परीक्षार्थी पाठवत मुख्याध्यापकाने पीडित मुलीला शाळेलगतच्या घरात नेत तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी मुख्याध्यापक आणि अन्य दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोनिपत येथील गोहाना या गावात राहणारी १६ वर्षांची मुलगी दहावीत शिकते. मुलीने दहावीच्या परीक्षेत पास व्हावे, यासाठी तिच्या वडिलांनी मुख्याध्यापकाशी संपर्क साधला. त्यांनी मुख्याध्यापकाला या कामासाठी १० हजार रुपये देण्याची तयारीही दर्शवली. मुख्याध्यापकाने ८ मार्च रोजी पीडित मुलीच्या वडिलांना फोन केला. ‘तुमच्या मुलीला घेऊन शाळेत या. परीक्षेत तिच्या ऐवजी डमी परीक्षार्थी पाठवण्यात येईल. तोपर्यंत मुलगी शाळेलगत माझ्या नातेवाईकाच्या घरी थांबेल. परीक्षा संपल्यावर तुम्ही तिला घेऊन जा’, असे त्याने पीडितेचे वडिलांना सांगितले होते.
