माशाचे तेल हे बराच काळापासून मानवी शरीरासाठी पोषक मानले जाते, कारण त्यात ओमेगा ३ मेदाम्ले असतात. तसेच त्यामुळे ओमेगा ६ मेदाम्लांचे दुष्परिणाम कमी केले जातात, त्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी ते उपयुक्त असते, त्यामुळे दृष्टी सुधारते, संधिवात कमी होतो.
या शिवाय त्यामुळे स्मरणशक्तीही वाढते असा दावा करण्यात आला आहे. पण प्रत्यक्षात ओमेगा ३ मेदाम्लांनी म्हणजेच माशाच्या तेलामुळे मुलांची बुद्धी वाढून त्यांचे वर्तनही सुधारते यात फारसे तथ्य नसल्याचे संशोधनात दिसून आले आहे.
यापूर्वीच्या अभ्यासात असे म्हटले होते की, ओमेगा तीन मेदाम्लांमुळे मुलांच्या वाचन क्षमतेवर चांगला परिणाम होतो.
त्यात अटेन्शन डेफिसिट हायपर अॅक्टिव्हिटी डिसऑर्डर म्हणजे एडीएचडीची लक्षणे कमी होतात.
ओमेगा ३ मेदाम्लांमुळे मुलांच्या स्मृतीवर चांगला परिणाम होतो.
युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्डचे संशोधक थीस स्प्रेकेलसन यांनी सांगितले की, ओमेगा ३ मेदाम्लांचे अनेक फायदे असले तरी ते मुलांचे अध्ययन व वर्तन यावर परिणाम करतात याचे ठोस पुरावे नाहीत.
सात ते नऊ वयोगटातील ३७६ मुलांचा अभ्यास यात करण्यात आला. त्यात ते अभ्यासात फारसे चमकलेले नव्हते. यातील निम्मी मुले १६ आठवडे रोज ओमेगा ३ मेदाम्ले माशांच्या तेलातून घेत होते. उर्वरित मुले १६ आठवडे मेदाम्ले घेत नव्हते.
