मुलींशी गैरवर्तन करत वडिलांची आत्महत्या

सावत्र वडिलानेच दोन मुलींशी अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात समोर आला आहे. या नराधम वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या आरोपीने पालघरमध्ये रेल्वेखाली आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे.

वागळे इस्टेटमधील श्रीनगर भागात ४३ वर्षीय आरोपी राहतो. तो त्याच्या १५ वर्षांच्या मुलीला आइसक्रीम आणण्याचा बहाणा करून मुलीला गाडीतून घरातून घेऊन गेला. नाशिक हायवेवरील एका निर्जन ठिकाणी रस्त्याच्या कडेला गाडी थांबवली आणि मुलीला जबरदस्तीने बिअर प्यायला दिली. त्यानंतर त्याने मुलीशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. या प्रकाराने घाबरलेल्या मुलीने घरी घेऊन चला असा तगादा वडिलांना लावला. मात्र आरोपीचे अश्लील चाळे सुरूच होते. या प्रकाराबाबत कोणाला काही सांगितल्यास संपवण्याची धमकी मुलीला दिली. या सावत्र वडिलाने २०१४मध्ये १८ वर्षांच्या मुलीशी देखील अश्लील कृत्य केले होते. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर आरोपीविरुद्ध रविवारी श्रीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आरोपी फरार होता. मात्र या आरोपीने पालघरमध्ये रेल्वेखाली आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने देखील या आत्महत्येच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *