नवीन सोफ्यावर बसण्यावरून झालेल्या भांडणामुळे बारा वर्षांच्या मुलाने आत्महत्या केली. विरारच्या चंदनसार येथे ही घटना घडली. कुणाल मिश्रा असे या मुलाचे नाव आहे.
विनोद मिश्रा हे विरार पूर्वेच्या चंदनसार येथील धन्यवाद इमारतीत पत्नी आणि तीन मुलांसमवेत राहतात. ते खासगी कंपनीत लेखापाल म्हणून काम करतात. बुधवारी त्यांनी घरात नवीन सोफा आणला होता. त्यांचा मोठा मुलगा कुणाल (१२) हा या सोफ्यावर लहान भावंडांना बसू देत नव्हता. त्यावरून भावंडांत वाद झाला. कुणालचे वडील यावरून कुणालला ओरडले आणि सोफ्यावर सगळ्यांनी बसायचे, असे त्यांनी सांगितले. वडील ओरडल्याने कुणालला राग आला. गुरुवारी घरात कुणी नसताना दुपारी कुणाल गॅलरीत गेला आणि लोखंडी हुकाला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. सोफ्यावर सगळ्यांना बसू दे, असे सांगत वडिलांनी त्याला दम दिल्याने आत्महत्या केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घनश्याम आढाव यांनी सांगितले.
