इज्तेमामध्ये विनापरवानगी गन बाळगणारा अलाहाबादचा पोलिस शिपाई निलंबित

लिंबेजळगावातील तब्लीगी इज्तेमात सरपंचाच्या सुरक्षेसाठी विनापरवानगी कार्बाईड गन बाळगलेल्या अलाहाबादेतील पोलिस शिपायाला निलंबित करण्यात आले. दोन दिवसांपासून त्याला वाळुज पोलिस ठाण्यात बसवून ठेवले होते. सोमवारी अलाहाबाद पोलिस अधीक्षकांनी त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली. यानंतर शिपायाला सोडण्यात आले.

उत्तर प्रदेशातील अलाहाबादमधील एका गावच्या सरपंचाच्या वडिलांचा काही वर्षांपुर्वी खून झालेला आहे. त्यामुळे या सरपंचाला पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. २४ फेब्रुवारी रोजी सुरु झालेल्या लिंबेजळगावातील तब्लीगी इज्तेमासाठी सरपंच पोलिस संरक्षणात आला. पण त्याच्या संरक्षणासाठी आलेल्या शिपायाने अलाहाबाद पोलीस अधीक्षकांची कोणतीही परवानगी न घेता कार्बाईड गन सोबत घेतली होती. इज्तेमाच्या आवारात स्थानिक पोलिसांनी सुरक्षेसाठी आलेल्या शिपायाची तपासणी केली. तेव्हा त्याच्याजवळ कार्बाईड गन आढळून आली. त्यामुळे स्थानिक पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून कार्बाईड  गनसह जिवंत काडतुसेही पोलिसांनी हस्तगत केली. यानंतर त्याला वाळुज पोलिस ठाण्यात बसवून ठेवले. या शिपायाबाबतची माहिती औरंगाबाद पोलिसांनी अलाहाबाद पोलिस अधीक्षकांना कळवली. यानंतर तेथील अधीक्षकांनी कामात निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत त्या शिपायाचे निलंबन केल्याचे सूत्रांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *