दीपक सखाराम कुलकर्णी अर्थात डीएसके यांना अटक झाल्यामुळे पुन्हा एका यशस्वी मराठी उद्योजकाच्या कारकिर्दीला ग्रहण लागल्याचे स्पष्ट झाले आहे. शून्यातून विश्व उभारणाऱ्या या उद्योजकाला गुंतवणूकदारांच्या ठेवी परत करण्यात अपयश आल्याने कोर्टानेही अखेर त्यांच्या अटकेवर शिक्कामोर्तब केले. सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या डीएसकेंनी वयाच्या २० व्या वर्षी टेलिफोन पुसण्यापासून व्यवसायाला सुरुवात केली. त्यानंतर विविध व्यवसाय करून १९८०मध्ये त्यांनी गृहनिर्माण क्षेत्रात प्रवेश केला. कायम मध्यमवर्गीय ग्राहक डोळ्यासमोर ठेवून व्यवसाय करणाऱ्या डीएसकेंनी भांडवल उभारणीसाठी सर्वसामान्यांकडूनच ठेवी स्वीकारण्याचा निर्णय घेतला. अनेक वर्षे वेळेवर परतावा दिल्याने ग्राहकांचा विश्वासही वाढला. परंतु, गेल्या दीड वर्षांपासून डीएसकेंकडील ठेवी आणि व्याज अडकून पडल्याने हजारो ठेवीदार हवालदिल झाले होते.
कसबा पेठेत बालपण गेलेल्या डीएसकेंनी बोरे विकणे, भाजी, फटाके विकणे आदी व्यवसाय करून घराला हातभार लावला. कॉमर्सचे शिक्षण घेताना त्यांनी ‘टेलिस्मेल’ नावाची कंपनी सुरू केली. त्यानंतर घरांचे रंगकाम, फर्निचर, प्लंबिंग, वॉटरप्रुफिंग असे व्यवसाय करत डीएसकेंनी १९८० साली गृहनिर्मिती क्षेत्रात उडी घेतली. बँकांकडून बांधकाम क्षेत्राला फारसे पैसे दिले जात नाहीत, हे ओळखून डीएसकेंनी भांडवलवृद्धीसाठी सर्वसामान्य नागरिकांना साद घातली. १९८० च्या दशकाच्या अखेरीस डीएसकेंनी आकर्षक व्याज देऊन सर्वसामान्यांकडून ठेवी मिळवल्या. बँकांपेक्षा अधिक परतावा आणि विश्वास म्हणून सर्वसामान्यांनीही डीएसकेंच्या योजनेला पाठिंबा दिला. प्रत्येकाला ठरलेल्या दिवशी आणि ठरलेल्या दराप्रमाणे व्याजासह रक्कम परत मिळाल्याने डीएसकेंकडील ठेवींचा ओघही वाढला. त्यामुळेच अगदी पाच-दहा हजारापासून ते वीस-पंचवीस लाखांपर्यंत आयुष्यभराची पुंजीही अनेकांनी विश्वासाने डीएसकेंच्या हाती दिली. त्याच्याच जोरावर डीएसकेंचे विश्व विस्तारत गेले. ‘घराला घरपण देणारी माणसं’ ही त्यांची ओळखही अल्पावधीतच लोकप्रिय झाली. दरम्यानच्या काळात गाड्यांचे वितरण, महागड्या बाइक्सची निर्मिती आणि विक्री, आंतरराष्ट्रीय शाळा, अॅनिमेशन, डिझाइन स्कूल, रोबोटिक्स, हेलिकॉप्टर सेवा आदी व्यवसायही त्यांनी सुरू केले. डीएसकेंचे वाढते साम्राज्य पाहून अनेकांनी आपली प्रॉव्हिडंट फंड, पेन्शन, ग्रॅच्युइटी डीएसकेंच्या हवाली केली.
बांधकाम क्षेत्रातील मंदी, त्यातच ड्रीम सिटी प्रकल्पातून परकी गुंतवणूकदारानेही घेतलेली माघार यामुळे डीएसकेंच्या अडचणी वाढल्या. दरम्यानच्या काळात डीएसकेंचा मोठा अपघात झाला. त्यानंतर नोटाबंदीमुळेही कंपनीला फटका बसला. त्याच काळात डीएसकेंकडून दिले गेलेले धनादेश न वटता परत जाऊ लागले. त्यामुळे अनेक ठेवीदारांनी ठेवी काढून घेतल्या. तिथून डीएसकेंच्या अडचणी वाढू लागल्या. डीएसकेंकडून वारंवार आश्वासन मिळूनही ठेवी परत न मिळाल्याने अखेर ३५० हून अधिक गुंतवणूकदारांनी पोलिसांत तक्रार दिली, तसेच कोर्टातही धाव घेतली. अखेरीस १७ फेब्रुवारीला डीएसके आणि पत्नी हेमंती यांना अटक होऊन सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
