इम्रान खान यांचा तिसऱ्यांदा निकाह; ट्विटरवर कबुली

 क्रिकेटचं मैदान गाजवून राजकारणाच्या आखाड्यात उतरलेले पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू इम्रान खान हे तिसऱ्यांदा विवाहबद्ध झाले आहेत. ‘तेहरीक-ए-इन्साफ’ या त्यांच्या राजकीय पक्षाच्या ट्विटर अकाउंटवरून या लग्नाची अधिकृत घोषणा करण्यात आलीय.

इम्रान खान यांनी १ जानेवारी रोजी तिसऱ्या लग्नाचा बार उडवून दिल्याची जोरदार चर्चा होती. परंतु, त्यांच्या निकटवर्तीयांनी मात्र हे वृत्त फेटाळलं होतं. मात्र, इम्रान यांनी उशिरा का होईना, हा निकाह ‘कुबुल’ केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून या लग्नाचे फोटोही शेअर करण्यात आले आहेत. पाकिस्तानी मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, इम्रान खानच्या तिसऱ्या पत्नीचे नाव बुशरा मेनका पीर असं असून ती वयाच्या चाळीशीत आहे. इम्रान आणि बुशरा यांची ओळख दोन वर्षांपूर्वी झाली असून इम्रान तिच्याकडे आध्यात्मिक धडे गिरवायला जायचे. इम्रान यांनी जानेवारी महिन्यात बुशरासमोर निकाहाचा प्रस्ताव मांडला आणि नुकताच तिनं तो स्वीकारला.

इम्रान खानचं पहिलं लग्न ब्रिटिश उद्योजिका जेमिमा गोल्डस्मिथ हिच्याशी झालं होतं. नऊ वर्षं एकत्र संसार केल्यानंतर त्यांनी सहमतीनं घटस्फोट घेतला. २०१५मध्ये त्यांनी टीव्ही रिपोर्टर रेहम खानशी दुसऱ्यांदा निकाह केला. परंतु, अवघ्या दहा महिन्यातच ते दोघं वेगळे झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *