प्रियकराशी आलेल्या शरीरसंबंधातून पोटात वाढलेला गर्भ पाडताना गर्भासह अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी कळंबोलीत घडली. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे रुग्णालयात नेण्यात आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. रविवारी उशिरा कळंबोली पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली. १७ वर्षीय अल्पवयीन प्रियकराविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर कॉलेजात शिकणाऱ्या १६ वर्षीय मुलीचे तिच्याच कॉलेजातील १७ वर्षीय तरुणासोबत प्रेम होते. प्रेमप्रकरणातून त्यांचे अनेक वेळा शरीरसंबंध आल्याचे या घटनेमुळे उघडकीस आले. गर्भवती असल्याचे समजल्यानंतर प्रियकराने या मुलीला गर्भपात करण्याच्या गोळ्या घेऊन दिल्या. या गोळ्या खाल्यामुळे रविवारी दुपारी मुलीला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला. रक्तस्राव झाल्यामुळे तिची प्रकृती खालावली. घरच्यांनी तिला कळंबोलीतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिचा मृत्यू झाला होता. रुग्णालय व्यवस्थापनाने पोलिस ठाण्यात या घटनेची माहिती दिल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले. या प्रकरणी १७ वर्षीय अल्पवयीन प्रियकरावर बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला असून गर्भपात करण्यासाठी मुलीला दिलेल्या गोळ्यादेखील ताब्यात घेण्यात आल्या आहेत. मात्र भीतीपोटी या तरुणाने पळ काढला असून कळंबोली पोलिस त्याचा तपास करीत आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक महेंद्र मोरे करीत आहेत.