दागिने देण्यास विरोध करणाऱ्या महिलेची दरोडेखोरांकडून हत्या

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील सोड्डी गावात दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. दरोडेखोरांच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला. ही घटना गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. कस्तुरी रामण्णा बिराजदार (वय ६०) असे मृत महिलेचे नाव असून मलकप्पा रेवगोंडा बिराजदार असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी मंगळवेढा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

अधिक माहिती अशी की, मंगळवेढा तालुक्यातील सीमावर्ती ठिकाणी असलेल्या सोड्डी येथे दरोडेखोरांनी हैदोस घातला. अन्य दोन ठिकाणी घरफोडी केल्यानंतर त्यांनी बिराजदार यांच्या घराकडे मोर्चा वळवला होता. दरोडेखोरांनी कस्तुरी बिराजदार यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. पण त्याला बिराजदार यांनी विरोध केल्यामुळे चिडलेल्या दरोडेखोरांनी त्यांना बेदम मारहाण केली. यात कस्तुरी बिराजदार यांचा मृत्यू झाला. तर मलकप्पा बिराजदार हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जत येथील रूग्णालयात नेण्यात आले.

या गावातील बहुसंख्य लोक हे उपजीविकेसाठी सांगली व कोल्हापूर भागात ऊसतोडणीसाठी जातात. त्यामुळे बहुतांश वयोवृद्ध लोकच गावात असतात. तसेच हे गाव कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमेवर असल्याने दरोडेखोरांना पसार होणे सहज शक्य होते. पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी घटनास्थळी भेट दिली असून पोलीस तपास करत आहेत. या प्रकारामुळे सोड्डी गावात व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *