ठाणे महापालिका निवडणुकीच्या काळात विविध गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्यामुळे चर्चेत असलेले कळव्यातील शिवसेनेचे नगरसेवक गणेश कांबळे हे पत्नी कॅरलिन यांना केलेल्या मारहाणीप्रकरणी पुन्हा वादात सापडले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून गणेश कांबळे हे आपल्याला सातत्याने मारहाण करीत असल्याचा आरोप त्यांच्या पत्नी कॅरलिन यांनी केला आहे. विशेष म्हणजे, गेल्या आठवडय़ात गणेश यांनी केलेल्या मारहाणीची तक्रार करण्यासाठी कळवा पोलीस ठाण्यात गेलेल्या कॅरलिन यांना पोलिसांनी लग्नाचा दाखला घेऊन येण्यास सांगत या प्रकरणी कौटुंबिक हिंसाचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. कॅरलिन यांनी आता याबाबत पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याकडे तक्रार केली आहे.
ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत कळवा परिसरात शिवसेनेच्या तिकिटावर गणेश कांबळे हे निवडून आले. ते कळव्यातील महात्मा फुलेनगर परिसरात राहतात. पत्नी कॅरलिन आणि दोन मुले असा त्यांचा परिवार आहे. गेल्या दोन वर्षांपासून गणेश कांबळे हे घरगुती कारणांवरून सातत्याने आपल्याला मारहाण करीत असल्याचे कॅरलिन यांचे म्हणणे आहे. २८ जानेवारीला सायंकाळी गणेश यांनी घरगुती कारणावरून हातांनी बेदम मारहाण करून भिंतीवर डोके आपटले, अशी तक्रार कॅरलिन यांनी केली आहे. या मारहाणीदरम्यान मदतीसाठी आलेल्या शेजाऱ्यांनाही त्यांनी मारहाण केली, असे त्यांनी सांगितले. या घटनेनंतर कॅरलिन यांच्या मुलाने पोलिसांना बोलावून घेतले. मात्र, पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. गणेश यांच्यावर कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी कॅरलिन यांनी केली. मात्र, त्यासाठी त्यांना दुसऱ्या दिवशी पोलीस ठाण्यात येण्याची सूचना देण्यात आली. त्यानुसार दुसऱ्या दिवशी करॅलिन या पोलीस ठाण्यात गेल्या असता, पोलिसांनी त्यांच्याकडे आधारकार्ड, पॅनकार्ड आणि लग्नाचा दाखल्याची मागणी केली.
