चित्रिकरणावर बंदीची ब्राह्मण महासभेची मागणी
पद्मावत चित्रपटाचा वाद मिटला नसतानाच आता झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यावर काढण्यात आलेल्या ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झाशी’ या चित्रपटावर वाद सुरू झाला आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण राज्य सरकारने तातडीने थांबवावे, अशी मागणी सर्व ब्राह्मण महासभा या संस्थेने केली आहे.
कंगना रणोत ही यात राणी लक्ष्मीबाईच्या भूमिकेत आहे. संघटनेने म्हटले आहे, की यात राणी लक्ष्मीबाई तत्कालीन ईस्ट इंडिया कंपनीच्या ब्रिटिश हस्तकाबरोबर प्रेम करताना दाखवली असून त्यात प्रणयगीत चित्रित केले आहे. कमल जैन या चित्रपटाचे निर्माते असून त्यांनी हा आरोप फेटाळला आहे.
ईस्ट इंडिया कंपनीच्या ब्रिटिश हस्तकाबरोबर राणी लक्ष्मीबाईंचे प्रेमप्रकरण दाखवले असून त्यात एक गाणेही चित्रित केले जात असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे असा दावा महासभेने केला आहे.
जयश्री मिश्रा यांच्या ‘राणी’ या वादग्रस्त पुस्तकावर हा चित्रपट बेतलेला असल्याचे महासभेचे अध्यक्ष सुरेश मिश्रा यांनी सांगितले. प्रशासनाने आमच्या मागणीची दखल घेतली नाही तर निषेध आंदोलन चिघळत जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. या चित्रपटात वादग्रस्त दृश्ये नाहीत, इतिहासाचे विकृतिकरण केलेले नाही असे लेखी दिल्यानंतरच चित्रीकरण होऊ दिले जाईल. आम्ही राज्यपाल व गृहमंत्री यांना भेटून ही गोष्ट त्यांच्या कानावर घालणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
