तैवानच्या ईशान्य किनाऱ्याजवळ मंगळवारी रात्री झालेल्या तीव्र भूकंपाच्या धक्क्यात २ ठार झाले असून २५० हून अधिक लोक गंभीर झाले आहेत. भूकंपाची तीव्रता ६.४ रिश्टर इतकी होती. भूकंपाचे केंद्र हुआलिन या बंदरापासून २१ किलोमीटर अंतरावर होते. स्थानिक वेळेनुसार रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी भूकंपाचा तीव्र धक्का बसला. परिसरातील नागरिकांनी भीतीने रस्त्यांवर धाव घेतली. काही ठिकाणी इमारती कोसळल्या आणि वीजपुरवठा बंद झाला. तसेच अनेक इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
भूकंपाच्या धक्क्यांनी हुआलिन शहरातील मार्शल या फोर स्टार हॉटेलची इमारत खचली असून त्यात मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मदतीसाठी लष्करालाही पाचारण करण्यात आल्याचं या विभागाने स्पष्ट केलं. या भूकंपामुळे महामार्ग आणि पुलांचं नुकसान झाल्यानं रस्ते तसंच रेल्वे वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झाला आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या २८ लोकांना आतापर्यंत बाहेर काढण्यात यश आलं आहे. तर स्थानिक वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यात २५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत त्यांच्यावर उपाचार सुरू आहे. भूकंपाची तीव्रता आणि इमारतींचं झालेलं नुकसान पाहता मृतांचा आकडा वाढण्याची शक्याता वर्तवली जात आहे. यात १४० हून अधिक जण बेपत्ता झाले असल्याची माहितीही काही वृत्तपत्रांनी दिली आहे. गेल्यावर्षी ६.४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने तैवानमध्ये ११६ जणांचा मृत्यू झाला होता.
