जम्मू-काश्मीरमध्ये राजौरी जिल्ह्यात सीमेवर रात्रभर पाकिस्तानकडून गोळीबार सुरूच असून, यात सोमवारी एक जवान जखमी झाला. दरम्यान, ‘पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देत राहू आणि आमच्या कृतीतून ते दिसेल,’ असा इशारा लष्कराचे उपप्रमुख सरत चंद यांनी दिला आहे.
पाकिस्तानच्या गोळीबारात काल एका कॅप्टनसह चार जवान हुतात्मा झाले होते. पाकिस्तानने आजही हा गोळीबार सुरूच ठेवला आहे. राजौरीत पाकिस्तानकडून रात्रभर गोळीबार सुरू आहे. यात सीमा सुरक्षा दलाचे एक उपनिरीक्षक जखमी झाले आहेत. राजौरी जिल्ह्यात सीमेवर रात्रभर गोळीबार आणि तोफांचा मारा सुरू होता. केरी भागात उपनिरीक्षक जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या भागात सीमेवरून नागरिकांना हलविण्यात आलेले नाही. मात्र, या भागातील ८४ शाळा तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत.
