विद्यार्थिनींशी अश्लील चाळे करणाऱ्या शाळेच्या संस्थापकाला अटक

जुन्नरमध्ये एका शाळेचा संस्थापकच विद्यार्थिनींशी अश्लील चाळे करत असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना येनेरे येथील एका खासगी इंग्रजी शाळेत घडली आहे.या प्रकरणी शाळेचे संस्थापक सचिन घोगरे याला पोलिसांनी अटक केली. पालकांच्या फिर्यादीवरून जुन्नर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदिवासी विकास विभागांतर्गत जव्हार प्रकल्पातील २५० विद्यार्थी हे जुन्नर तालुक्यातील येनेरे येथे खासगी इंग्रजी शाळेत शिक्षण घेत आहेत. शाळेमधील बाथरूमच्या नळाला पाणी येते का, हे पाहण्याच्या बहाण्याने सचिन घोगरे आदिवासी विद्यार्थिनींना बाथरूममध्ये बोलावून घेत असे. त्यानंतर त्यांच्यासोबत अश्लील चाळे करत असे. याची वाच्यता केल्यास जीवे मारू अशी धमकी त्याने विद्यार्थिनींना दिली होती.

आदिवासी अस्मिता संघटना पालघर यांनी पुढाकार घेऊन आदिवासी विद्यार्थिनींना न्याय मिळवून देण्यासाठी पालकांना हाताशी घेऊन त्या संचालकावर जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तसेच पोलिसांनी त्या आरोपीला अटकही केली आहे. यापैकी पीडित मुलगी ही गेल्या दोन वर्षांपासून वसतीगृहात राहून शिक्षण घेत होती. यानंतर आणखी चार विद्यार्थिनींनी सचिन घोगरेविरोधात तक्रार दाखल केली, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ दिवटे यांनी दिली आहे. सध्या पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *