दहा हजारांच्या बनावट नोटा जप्त

माढा तालुक्यातील टाकळी (टे) या गावी पोलिसांनी छापा टाकून ५० रुपयांच्या बनावट नोटा बनविणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले. या वेळी पोलिसांवर झालेल्या दगडफेकीत दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. पुणे जिल्ह्यातील भिगवण येथे एकाला ५० रुपयांच्या बनावट नोटा खपवताना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे चौकशी करताना आपल्याला या नोटा टेंभुर्णीजवळील टाकळीच्या वसिष्ठ जाधव याच्याकडून मिळाल्याचे पोलिसाना कळाले. पुणे ग्रामीण पोलीस आणि टेंभुर्णी पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी टाकळी येथे छापा टाकला. या आरोपींनी पोलिसांवर दगडफेक सुरू केली. यात दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले. मात्र, पोलिसांनी त्याच परिस्थितीत या घरावर छापा टाकून वसिष्ठ जाधव आणि जळगाव येथील त्याचा साथीदार रवी पाटील याला ताब्यात घेतले. घटनास्थळी पोलिसांना स्कॅनर, प्रिंटर, लॅपटॉप आणि १० हजार रुपये किमतीच्या ५० रुपयांच्या बनावट नोटा मिळाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *