देशभरात वादग्रस्त ठरलेल्या पद्मावत सिनेमाबाबत एक धक्कादायक बातमी आहे. करणी सेनेने केलेल्या निकराच्या विरोधामुळे देशातील चार प्रमुख राज्यांमध्ये पद्मावत प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि गोवा आदी राज्यांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार नाही. सुरक्षेच्या कारणावरून आगोदरच मल्टीप्लेक्स थिएटर मालकांनी चित्रपट प्रदर्शनास नकार दिला होता. मात्र, आता सिंगल स्क्रिन थिएटर मालकांनीही चित्रपट प्रदर्शित करण्यास नकार दिला आहे.
मुंबईत विविध ठिकाणांहून आलेल्या करणी सेनेच्या ५० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच गुजरातमध्ये मंगळवारी अहमदाबादेत मल्टीप्लेक्समध्ये तोडफोड करण्यात आल्याने ५० लोकांना ताब्यात घेण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर मल्टिप्लेक्स एसोसिएशन ऑफ इंडियाने पद्मावत सिनेमा राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोवा या चार राज्यांत प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. ही संस्था ७५ टक्के मल्टीप्लेक्स मालकांचे प्रतिनिधीत्व करते.
