छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणास्थान असलेल्या त्यांच्या आई राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवाला जन्मगावी सिंदखेडराजा येथे सुरुवात झाली आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे यावेळी आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी उदयनराजे भोसले, संभाजीराजे आणि बाबाजीराजे भोसले उपस्थित राहणार आहेत. तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवालही येथे पोहोचले आहेत. दुपारी ते येथे सभा घेणार आहेत. २०१९च्या निवडणुकीचा बिगुलच ते येथे फुंकणार असल्याचे सुत्रांकडून कळते.
जिजाऊ जन्मोत्सावानिमित्त येथे सामुदायिक विवाह सोहळा, पोवाड्यांचे कार्यक्रम, इतर सांस्कृतिक कार्यक्रम आणि मान्यवरांची व्याख्याने होणार आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी येथे अबालवृद्धांसह तरुणांनी गर्दी केली आहे. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्तही येथे तैनात करण्यात आला आहे.
दुपारी देऊळगाव राजा रोडवरील भगवानबाबा महाविद्यालयाच्या मैदानावर केजरीवाल यांची सभा होणार आहे. या सभेसाठी गुरुवारी रात्रीच केजरीवाल औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत. सुरुवातीला स्थानिक पोलिसांनी केजरीवालांच्या सभेला परवानगी नाकारली होती. यावरुन पोलिसांवर टीका होऊ लागल्याने अखेर पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी या सभेसाठी परवानगी दिली. त्यामुळे केजरीवाल आता या सभेत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.
