पोलिसाचा ‘शोले’ स्टाइल ड्रामा

आपल्या कुटुंबीयांना त्रास देणाऱ्या आणि इमारतीच्या गच्चीवर जाऊन आत्महत्येची धमकी देणाऱ्या पोलिस हवालदाराला ठाणे पोलिस दलातून निलंबित करण्यात आले आहे. अमोल यशवंत यादव असे या हवालदाराचे नाव आहे. भिवंडीतल्या नारपोली पोलिस ठाण्यात कार्यरत असलेला हा हवालदार ठाण्यातील सेंट्रल मैदानानजीक असलेल्या पोलिस वसाहतीत आपल्या कुटुंबासमवेत राहतो.

२७ डिसेंबर रोजी पोलिस लाइन येथील आपल्या घरातून अमोल यादव हा मोठमोठ्याने ओरडून शिविगाळ करत होता. त्याची आठ महिन्यांची गर्भवती पत्नी घरात रडत होती. तर, पाच वर्षांच्या मुलाला सुरक्षेसाठी चाइल्ड प्रोटेक्शन युनिटच्या पोलिस हवालदार नितीन पाटील यांच्या घरी ठेवण्यात आले होते. अमोल याने घरातले सर्व सामान अस्ताव्यस्त केले होते. त्यावेळी काही पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तिथे धाव घेतली. कुणी हात लावला तर पहिल्या मजल्यावरून उडी मारीन, अशी धमकी अमोल देत होता. त्यानंतर चपलेने स्वतःलाच मारहाण करत वेड्यासारखे वर्तन अमोल करत होता. त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता तो इमारतीच्या गच्चीवर गेला. तिथे पत्नीचे नाव घेत टेरेसवरून उडी मारत आत्महत्या करण्याची धमकी तो देत होता.

अमोल याने आत्महत्या केली नसली तरी याप्रकरणी त्याच्या विरोधात ठाणे नगर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. जनमानसात पोलिसांची प्रतिमा मलिन केल्याचे वर्तन अमोल यादव याने केले आहे असा ठपका ठेवच पोलिस उपायुक्त डॉ. प्रियांका ननावरे यांनी त्याला निलंबित केले आहे. अमोल याने हा प्रकार का केला याबाबतची माहिती मात्र मिळू शकलेली नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *