‘जादूई पावडर’ने लावला चुना; अपत्यप्राप्तीच्या आमिषाने महिलांना गंडा घालणारी अटकेत

मूल होत नसलेल्या महिलांना पूजा करुन आणि आयुर्वेदिक ‘जादूई पावडर’ देऊन गर्भधारणा घडवून आणण्याचा दावा करणाऱ्या महिलेला विरार पोलिसांनी अटक केली. या महिलेने विरारमधील चार महिलांना सुमारे सात ते आठ लाख रुपयांचा गंडा घातला आहे. सुजाता खांडेकर उर्फ स्मिता कोचरेकर असे या अटक झालेल्या महिलेचे नाव आहे.

विरारमध्ये राहणाऱ्या ३३ वर्षीय महिलेला लग्नाला अनेक वर्षे उलटूनही मूल होत नव्हते. संबंधित महिलेला सुजाता खांडेकरबाबत माहिती मिळाली होती. अपत्यप्राप्ती होत नसलेल्या महिलांसाठी सुजाताकडे औषध असल्याचे तक्रारदार महिलेला समजले होते. संबंधित महिला तिच्या पतीसोबतच सुजाताकडे गेली होती. सुजाताने संबंधित महिलेला एक आयुर्वेदिक पावडर दिली. या ‘जादूई पावडर’मुळे गर्भधारणा होईल, असे सुजाताने सांगितले होते. यासाठी सुजाताने महिलेकडून तब्बल २ लाख रुपये घेतले. याशिवाय सुजाताने त्या महिलेला कृष्णाची मूर्ती देऊन त्याची पूजा करण्यास सांगितले.

काही दिवसांनी महिलेचे वजन वाढू लागले. गर्भवती झाल्याचा समज झाल्याने ती महिला डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेली. तपासणीत सुजाताचे बिंग फुटले आणि महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. सुजाताने त्या महिलेला वजन वाढण्यासाठी पावडर दिली होती. संबंधित महिलेसह आणखी चार महिलांही आता समोर आल्या आहेत. सुजाताने त्यांना देखील अपत्यप्राप्तीच्या नावाने गंडा घातला होता. ‘कधी कधी वजन वाढण्याच्या औषधांंमुळे मासिक पाळी उशिरा येऊ शकते किंवा येतच नाही. त्यामुळे महिलांना गर्भवती झाल्याचा गैरसमज होतो. याचाच फाय़दा सुजाताने घेतला होता’ असे पोलिसांनी सांगितले. सुजाताला रत्नागिरीतून अटक करण्यात आली आहे. सुजाता इस्टेट एजंट म्हणूनही काम करते. घर देण्याच्या नावाखालीही तिने अनेकांची फसवणूक केली होती, अशी माहिती समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *