लोअर परेल भागातल्या कमला मिल कंपाऊंडमधल्या हॉटेल मोजोला आग लागली आणि पाहता पाहता ही आग वा-यासारखी पसरली. आतापर्यंत आगीत गुदमरून 15 जण जिवानिशी गेलेत. त्यात एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. धैर्य ललानी हा अमेरिकेत नोकरी करतो. ख्रिसमसच्या सुट्टीनिमित्त तो भारतात आला होता.
सुट्टी एन्जॉय करण्यासाठी विश्वा ललानी हा भाऊ धैर्य ललानी आणि आत्या प्रमिला केनिया यांना पार्टीनिमित्त सोबत घेऊन हॉटेल मोजोमध्ये गेला आणि काळानं त्यांच्यावर घाला घातला. आग लागल्याचं समजताच विश्वा ललानी आणि धैर्य ललानी लागलीच हॉटेलच्या बाहेर आले. परंतु आत त्यांची आत्या प्रमिला केनिया अडकल्याचं समजताच पुन्हा त्यांनी हॉटेल मोजोमध्ये प्रवेश केला.
आत्येला वाचवण्याच्या प्रयत्नात त्या दोन्ही भावांना प्राण गमवावे लागले. महिन्याभराची सुट्टी घालवण्यासाठी अमेरिकेहून मुंबईत आलेल्या धैर्यचा प्रवास मोजो हॉटेलमध्येच संपला. पोलिसांनी मोजो पबच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलीस नेमकी आग कशामुळे लागली आहे, याचा शोध घेत आहेत.
