कर्नाटकमध्ये एप्रिल २०१३ ते नोव्हेंबर २०१७ दरम्यान ३५१५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून, त्यात २५२५ शेतकऱ्यांनी दुष्काळ व पिकांच्या हानीमुळे आत्महत्या केल्या, असे राज्याच्या कृषी खात्याने म्हटले आहे.
एप्रिल २००८ ते एप्रिल २०१२ या काळात ११२५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या याचा अर्थ कर्नाटकातही शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून येत आहे. एकूण ३५१५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे गुन्हे दाखल झाले असले तरी कृषी खात्याने २५२५ शेतकऱ्यांनी दुष्काळ व पीक हानीमुळे आत्महत्या केल्या असल्याचे मान्य केले. एप्रिल २०१५ ते एप्रिल २०१७ दरम्यान २५१४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यातील १९२९ कृषी खात्याने मान्य केल्या. एप्रिल २०१७ ते नोव्हेंबर २०१७ दरम्यान राज्यात पुरेसा पाऊस झाला होता त्यामुळे आत्महत्यांची संख्या कमी झाली. एकूण ६२४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यातील ४१६ कृषी खात्याने मान्य केल्या. कृषी संचालक बी. वाय. श्रीनिवास यांनी सांगितले, की ११२ आत्महत्यांना अजून राज्य सरकारच्या समितीकडून २०१३ पासून मान्यता मिळणे प्रलंबित आहे. नोव्हेंबरअखेर १०५ प्रकरणे प्रलंबित असून गेल्या वर्षीची वेगळी सात प्रकरणे अजून रेंगाळली आहेत. २०१५-१६ या काळात सर्वाधिक १४८३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर २०१३-१४ मध्ये सर्वात कमी म्हणजे १०६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.
कृषी अधिकारी कुमारस्वामी यांनी सांगितले, की सावकार ३० ते ४० टक्के अशा दराने कर्ज देतात, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. एकूण १३३२ सावकारांवर गुन्हे दाखल झाले असून, तीन वर्षांत ५८५ जणांना अटक करण्यात आली आहे. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भरपाई १ लाखावरून पाच लाख करण्यात आली आहे.
- आत्महत्या करणाऱ्यात ऊस उत्पादकांचे प्रमाण अधिक.
- ऊस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या आत्महत्या करणाऱ्यात सर्वाधिक असून, त्या खालोखाल कापूस व तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
