‘त्यांच्या चपलांमध्ये काहीतरी होते’; पाकिस्तानने भारताच्या आरोपांवर दिले स्पष्टीकरण

कुलभूषण जाधव यांच्या मुलाखतीदरम्यान त्यांच्या आई आणि पत्नीला पाकिस्तानने योग्य वागणूक दिली नाही तसेच जाधव यांच्या पत्नीच्या चपलाही जप्त करण्यात आल्या होत्या. या भारताच्या आरोपावर स्पष्टीकरण देताना त्यांच्या चपलांमध्ये धातूसदृश्य काहीतरी होते, असे पाकिस्तानने सांगितले आहे.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयातील प्रवक्त्यांकडून मंगळवारी एका निवेदनाद्वारे सांगितले की, जाधव यांच्या मुलाखतीदरम्यान संपूर्ण वातावरण हे त्यांना घाबरावणारे होते. त्यांचे कपडे देखील बदलण्यात आले होते. तसेच जाधव यांच्या पत्नीच्या चपलादेखील त्यांना परत देण्यात आल्या नाहीत. भारताच्या या आरोपांवर स्पष्टीकरण देताना पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, जाधव यांच्या पत्नीच्या चपला या सुरक्षेच्या कारणास्तव जप्त करण्यात आल्या होत्या. कारण त्यामध्ये संशयास्पद धातूची वस्तू आढळून आली होती. पाकिस्तान भारताशी उगाचच शब्दांचा खेळांमध्ये पडू इच्छित नाही, असेही पाकिस्तानने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

पाकिस्तानने म्हटले की, आपला गुन्हा कबूल करणारे दोषी दहशतवादी आणि हेरगिरी करणारे कमांडर जाधव यांच्या पत्नी आणि आई यांच्या भेटीनंतर २४ तासांनंतर भारताकडून करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे आणि सत्याची तोडमोड करून सादर करण्यात आले आहेत. जर भारताची चिंता योग्य होती. तर जाधव यांच्या आई आणि पत्नी यांनी किंवा भारतीय उच्चायुक्तांनी त्यांच्या दौऱ्यादरम्यान माध्यमांसमोर हा मुद्दा उपस्थित करायला हवा होता. कारण त्यांच्यापासून पाकिस्तानी माध्यमांचे प्रतिनिधी सुरक्षित अंतरावर उपस्थित होते.

पाकिस्तनाच्या परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैजल यांनी स्थानिक माध्यमांना सांगितले की, सुरक्षेच्या कारणास्तव जाधव यांच्या पत्नीच्या चपला जप्त करण्यात आल्या होत्या. त्यांची तपासणी करण्यात येत आहे. जाधव यांच्या आईने मानवतेच्या भावनेने पाकिस्तानने मुलाला भेटण्याची परवानगी दिल्याबद्दल सर्वांसमोर आभार मानले. ही गोष्ट माध्यमांनी चित्रीतही केली आहे, असेही फैजल यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानातील तुरुंगात असलेल्या कुलभूषण जाधव यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या आई अवंती जाधव आणि पत्नी चेतनकुल जाधव यांनी मंगळवारी दिल्लीत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली. यावेळी परराष्ट्र सचिव एस. जयशंकर, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविशकुमार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *