मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गांवर उद्या काही महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. दोन्ही मार्गांवर मेगाब्लॉकदरम्यान काही लोकल रद्द, तर काही लोकल उशिरानं धावणार आहेत. पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मात्र दिलासा आहे. कारण पश्चिम रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक घेण्यात येणार नाही.
मध्य रेल्वे :
मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा अप धीम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार असून हा मेगाब्लॉक सकाळी 11 वाजून 15 मिनिटांपासून जुपारी 3 वाजून 15 मिनिटांपर्यंत असणार आहे.
मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकदरम्यान ठाण्याहून सीएसटीच्या दिशेने येणाऱ्या सर्व धीम्या गाड्या अप जलद मार्गांवर वळवण्यात येणार आहेत. या गाड्या भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, सायन या रेल्वेस्थानकांवर थांबतील. मात्र, माटुंग्यापासून या गाड्या अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील.
हार्बर रेल्वे :
हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक गुरु तेग बहादूर नगर (जीटीबी नगर) ते मानखुर्द अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगाब्लॉक सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 3 पर्यंत असणार आहे.
हार्बर रेल्वेवरील मेगाब्लॉकदरम्यान सीएसटी ते पनवेल, वाशी, बेलापूर या रेल्वेमार्गांवरील वाहतूक पूर्णपणे बंद राहील. मात्र, सीएसटी ते अंधेरी, वांद्रे हा मार्ग वेळापत्रकानुसारच सुरु राहणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल ते मानखुर्द या स्थानकांदरम्यान काही विशेष लोकल चालवल्या जाणार आहेत.

