रेल्वे सुरक्षा रक्षक ‘त्या दोघीं’साठी देवदूत बनले

कल्याण रेल्वे स्थानकात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन महिला प्रवाशांचे प्राण रेल्वे सुरक्षा दलातील कर्मचाऱ्यांनी वाचवले. हवालदार किरण पवार आणि कृष्णाकुमार मीना या कर्मचाऱ्यांनी नावे आहेत.

२१ डिसेंबर रोजी दुपारी कल्याण रेल्वे स्थानकात कृष्णाकुमार मीना हे कार्यरत होते. कल्याण रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक-५ वर मुंबईहून बंगळूरुला जाणारी उद्यान एक्स्प्रेस उशिराने धावत असल्याने प्रवाशांची फलाटावर गर्दी जमली होती. कृष्णाकुमार मीना हे त्या वेळी फलाटावर गस्त घालण्याचे काम करत होते. सकाळी ९ वाजताच्या सुमारास उद्यान एक्स्प्रेस फलाटावर येताच प्रवाशांची गाडी पकडण्यासाठी एकच झुंबड उडाली. या प्रवाशांमध्ये एक महिला होती. तिच्या लहान मुलाला घेऊन गाडीमध्ये चढण्याच्या प्रयत्नात असताना ती महिला मुलासह फलाट आणि गाडीच्या मोकळ्या जागेत पडली. त्याच वेळी कर्तव्यावरील  कृष्णाकुमार मीना यांनी तिला वर उचलून तिला वर खेचले.

प्रवाशांच्या गोंगाटामुळे गाडी काही अंतरावर जाऊन थांबली. कृष्णाकुमार मीना यांनी प्रसांगावधान राखून या महिलेचा जीव वाचवला.

१६ डिसेंबर रोजी रेल्वे सुरक्षा दलाचे किरण पवार हे कल्याण रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ४ वर कार्यरत होते. मुंबईवरून बंगळुरूला जाणारी उद्यान एक्स्प्रेस ९ ते ९.३० च्या दरम्यान कल्याण रेल्वे स्थानकाच्या फलाटावर आली.

गाडी फलाटावर येताच अनेक प्रवासी चालत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न करू लागले. याच प्रवासांमध्ये एक महिला आणि दोन मुले असे एक कुटुंब होते.

गाडीत चढण्याच्या प्रयत्नात या कुटुंबातील एका मुलीचा पाय घसरला आणि त्यामुळे ती आणि तिची आई अडखळून खाली कोसळली. मुलीने कसेबसे स्वतला सावरले आणि ती गाडीत शिरली.

परंतु याच अपघातात तिच्या आईच्या शरीराचा अर्धा भाग फलाट आणि गाडी यांच्यातील मोकळ्या जागेत गेला. या वेळी पवार या प्रवाशांच्या मदतीला धावून गेले. तातडीने त्यांनी त्या महिलेला खेचून फटीतून बाहेर काढले आणि जीवितहानी टळली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *