सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकरांचेच नाव

सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकरांचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर विधिमंडळ अधिवेशनात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी असा कोणताही निर्णय शासनाने घेतला नसल्याचे स्पष्टीकरण दिल्यामुळे नामांतराबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली होती, परंतु अखेर आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकरांचे नाव देण्याचा निर्णय झाल्याची माहिती विधान परिषदेत दिल्याने नामांतराबाबतची संभ्रमावस्था संपुष्टात येण्याचे संकेत मिळाले आहेत.

सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकरांचे नाव देण्याची घोषणा गेल्या महिन्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपुरात धनगर समाजाच्या मेळाव्यात केली होती. मुळात या विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्यायचे की सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वरांचे नाव द्यायचे, यावरून वाद निर्माण झाला होता. सिद्धेश्वरांच्या नावासाठी वीरशैव लिंगायत समाजाने मोठे आंदोलन उभे केले असताना दुसरीकडे अहिल्यादेवी होळकरांचे नाव या विद्यापीठाला देण्याच्या मागणीसाठी धनगर समाजानेही मोठे आंदोलन करून शक्तिप्रदर्शन केले होते. या विद्यापीठाला कोणाचे नाव द्यायचे, यासाठी स्वतंत्र असे वेगवेगळे २८ प्रस्ताव आले होते. त्यामुळे जातीय तेढ निर्माण होऊन विद्यापीठाच्या विकासाला बाधा येण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेनेच तसा अभिप्राय शासनाला कळवताना या विद्यापीठाला पूर्वीचे सोलापूर हेच नाव कायम ठेवण्याची शिफारस शासनाकडे केली होती. तथापि, ही शिफारस डावलून मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपुरात धनगर मेळाव्यात स्वत: सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराची घोषणा करीत या विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकरांचे नाव देण्याचे जाहीर केले होते. या घोषणेचे धनगर समाजाने जोरदार स्वागत केले असताना दुसरीकडे संतप्त झालेल्या वीरशैव लिंगायत समाजाने मुख्यमंत्री फडणवीस यांचा निषेध नोंदवत त्यांच्या पुतळय़ांचे दहन केले होते.

या पाश्र्वभूमीवर गेल्या आठवडय़ात विधिमंडळ अधिवेशनात मात्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी, सोलापूर विद्यापीठ नामांतराच्या संदर्भात एका प्रश्नावर लेखी उत्तर देताना या विद्यापीठाला कोणाचेही नाव देण्यात आले नाही, तर पूर्वीचेच सोलापूर हे नाव कायम ठेवण्याची शासनाची भूमिका असल्याचे स्पष्ट केले होते. त्यांच्या या निवेदनामुळे यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेली विद्यापीठ नामांतराची घोषणा वाऱ्यावरच विरणार असल्याचे स्पष्ट झाले, परंतु अखेर शुक्रवारी याच प्रश्नावर शासनातर्फे विधान परिषदेत निवेदन करताना विष्णू सावरा यांनी सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकरांचे नाव देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून, त्यासाठी एक उपसमितीही गठीत झाल्याची माहिती दिली. त्यामुळे विद्यापीठ नामांतराविषयीची शासनाची भूमिका स्पष्ट झाली असून त्याबाबतचा संभ्रमही दूर झाल्याचे दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *