हार्बर मार्गावर उरण ते उलवे हा नवीन रेल्वे मार्ग तयार करण्यात येत असल्याने पनवेल ते नेरूळ दरम्यान आजपासून तीन दिवस म्हणजे २२ ते २५ डिसेंबर दरम्यान जम्बो मेगाब्लॉक राहणार आहे. तर २५ डिसेंबर रोजी बेलापूर ते नेरूळ मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. प्रवाशांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून नवी मुंबई परिवहन सेवेने नेरूळ ते बेलापूर दरम्यान ३० अतिरिक्त बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या बसेस नेरूळ ते बेलापूर आणि खारघर ते पनवेल दरम्यान धावणार आहेत.
हार्बर मार्गावर एकूण १२ नवीन रेल्वे स्टेशन बांधण्यात येणार आहेत. त्यापैकी पाच रेल्वे स्टेशन पहिल्या टप्प्यात बांधण्याचे काम सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात असल्याने वेगाने हे काम पूर्ण करण्यासाठी बेलापूर ते नेरूळ पर्यंतची रेल्वेसेवा तीन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. तर या तीन दिवसात नवी मुंबई ते सीएसटी दरम्यानच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. या ३ दिवसांत सीएसटी ते नेरुळ मार्गापर्यंत रेल्वे सुरू असणार आहे. मात्र नेरुळ ते पनवेल रेल्वे सेवा ३ दिवस पूर्णपणे बंद असणार आहे. दरम्यान, बेलापूरच्या पुढे जाणाऱ्या प्रवाशांची यामुळे मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. कारण बेलापूरच्या पुढील खारघर, मानसरोवर, खांदेश्वर आणि पनवेल या स्टेशनवरुन प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे नेरूळ ते पनवेल ट्रेन पूर्णपणे बंद असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे. या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल होऊ नयेत म्हणून नवी मुंबई परिवहन सेवे मार्फत नेरूळ ते बेलापूर दरम्यान अतिरिक्त बसेस चालविण्यात येणार आहेत. उरण ते उलवे दरम्यान कोणतीही दळणवळणाची साधनं नव्हती. त्यामुळे या परिसराचा पाहिजेत तसा विकास झाला नाही. शिवाय लोकही या परिसरात राह्यला येत नव्हते. त्यामुळे रेल्वेने या मार्गावर रेल्वेस्टेशन बांधण्याचा निर्णय घेतला आणि त्याचे कामही सुरू केले.
