बर्थ-डे गिफ्ट म्हणून अख्खं जंगल तैमूरच्या नावे

अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या उपस्थितीत सैफ आणि करिनाच्या मुलाचा तैमूरचा वाढदिवस दणक्यात साजरा करण्यात आला. पतौडी परिवारातील या ‘छोट्या नवाब’वर शुभेच्छांचा आणि भेटवस्तूंचा वर्षाव झाला. पण यामध्ये सगळ्यात हटके ठरलं ते सेलिब्रिटी न्युट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरचं गिफ्ट. ऋजुतानं तैमूरचं नाव असलेलं ‘फॉरेस्ट’ त्याला भेट म्हणून दिलं आहे.

‘गो लोकल’चा सल्ला देणाऱ्या ऋजुता दिवेकरनं तैमूरला दिलेल्या या इकोफ्रेंडली गिफ्टची चांगलीच चर्चा रंगली आहे. मुंबईपासून ५० किमी अंतरावर असलेल्या सोनवे गावात हे ‘तैमूर फॉरेस्ट’ तयार करण्यात आलं आहे. यात ३ जांभूळ, १ फणस, १ आवळा, ४० केळी, १४ शेवग्याची, १ कोकम, १ पपई, ५ सीताफळ, २ रामफळ, २ लिंबांची झाडं लावली आहेत. याशिवाय, काही देशी धान्यं, मिरची, कढीपत्ता, झेंडू, हळद, आलं या झाडांचाही समावेश आहे. सुमारे १ हजार चौरस फूट जागेवर १०० विविध झाडं लावण्यात आली आहेत. ‘तैमूर हा भविष्यात निसर्गाच्या समृद्धीत आणखी भर घालेल, अशी आशा आहे. या अपेक्षेतूनच त्याला वाढदिवसाची ही भेट देत आहे’. असं लिहून ऋजुता दिवेकरनं या जागेचा फोटो शेअर केला आहे.

ज्येष्ठ शेतीतज्ज्ञ सुभाष पाळेकर यांच्या ‘झिरो बजेट’ नैसर्गिक शेतीच्या कल्पनेतून प्रेरणा घेत ऋजुता दिवेकरनं सामूहिक शेतीचा प्रकल्प सुरू केला आहे. यात तुम्ही स्वत:च्या नावावर वनाची जागा घेऊ शकता आणि त्यात शेतीही करू शकता. तैमूरच्या नावावरदेखील आता सोनवे गावात असंच फॉरेस्ट तयार झालं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *