पोलिसांना आता आठ तास काम!

येत्या २६ जानेवारीपासून मुंबईतील सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये पोलिसांना आठ तासांची पाळी सुरू करण्यात येणार आहे. देवनार पोलीस ठाण्यात दीड वर्षांपूर्वी हा प्रयोग राबवल्यानंतर शहरातील ४९ पोलीस ठाण्यांचा कारभार तीन पाळय़ांमध्ये यशस्वीपणे सुरू करण्यात आला. गुरुवारी त्यात आणखी १५ पोलीस ठाण्यांची भर पडली. या उपक्रमामुळे पोलीस कार्यतत्पर झालेच, पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही सकारात्मक बदल दिसत आहेत.

पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्या पुढाकाराने ५ मे २०१६ रोजी देवनार पोलीस ठाण्यात या प्रयोगाला सुरुवात करण्यात आली. नेहमीच्या कामकाजासोबत महापालिका निवडणूक, बकरी ईदसह मोठे सण, महापुरुषांची जयंती या धावपळीच्या काळातही देवनार पोलिसांनी उपलब्ध मनुष्यबळाचे अचूक नियोजन करून आठ तासांच्या तीन पाळय़ांमध्ये यशस्वीरीत्या काम करून दाखवले. त्यानंतर हा प्रयोग शहरातील अन्य पोलीस ठाण्यांमध्ये सुरू करण्यात आला. वेळोवेळी घेण्यात आलेल्या आढाव्यात प्रयोग यशस्वी ठरल्याने शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये तो सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या ६४ पोलीस ठाण्यांचे काम तीन पाळय़ांमध्ये सुरू आहे. उर्वरित ३० पोलीस ठाण्यांमध्ये ही कार्यपद्धती लवकर सुरू करून प्रजासत्ताक दिनाआधी शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांचे काम तीन पाळय़ांमध्ये चालवण्याचा पोलीस आयुक्तांचा मानस आहे. तूर्तास ही कार्यपद्धती पोलीस ठाण्यांमध्ये नेमणूक असलेल्या पोलीस शिपाई ते साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या कर्मचाऱ्यांपुरतीच मर्यादित आहे. भविष्यात पोलीस मुख्यालय, सशस्त्र विभागासह अन्य शाखांमध्येही ही कार्यपद्धती सुरू करता येईल का, यावर निर्णय घेण्यात येणार आहे.

पोलीस कार्यतत्पर

सध्या ही कार्यपद्धती सुरू असलेल्या पोलीस ठाण्यांचा आढावा घेतला जात आहे. या कार्यपद्धतीमुळे उपलब्ध मनुष्यबळाचे योग्य नियोजन केल्याने पोलीस ठाण्यांची कार्यतत्परता उंचावली आहे. गस्तीसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात चार वायरसेल व्हॅन आहेत. पूर्वी १२ तासांच्या दोन पाळ्यांमध्ये ही व्हॅन सरासरी २४० किलोमीटर कापून गस्त घालत असे. आता तीन पाळय़ांमध्ये ही वाहने एकूण ३६० किलोमीटर फिरून गस्त घालतात. तक्रारदारांच्या तक्रारी ऐकून घेतल्या जातात. पोलिसांच्या मुख्य कक्षांना जास्त मनुष्यबळ मिळू लागले आहे. त्यामुळे प्रशासकीय कामांसोबत, गुन्हा नोंदवणे, गाऱ्हाणी ऐकणे, गुन्ह्य़ाची उकल, बंदोबस्त, गस्त यासाठी जास्त मनुष्यबळ मिळू लागले आहे.

पोलिसांमध्ये आनंद

पूर्वी बारा तासांच्या दोन पाळ्यांमध्ये पोलीस काम करत. गंभीर गुन्हा घडला, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवला, निवडणूक, सण-उत्सवांमध्ये पोलीस १६ ते १८ तास अडकून पडत. आता ही वेळ आठ तास म्हणजेच निम्मी झाल्याने पोलिसांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त काम हातावेगळे करण्याची मानसिकता निर्माण होत आहे. सुटी घेण्याचे, न कळवता दांडी मारण्याचे प्रमाण १० टक्क्यांवरून तीन टक्क्यांवर आले आहे. कामाचे तास कमी झाल्याने बहुआयामी म्हणजेच स्मार्ट पोलीस तयार होण्याचे प्रमाण झपाटय़ाने वाढते आहे. आठ तास काम केल्यानंतर कुटुंबाला जास्तीत जास्त वेळ देणे पोलिसांना शक्य होत आहे.

अतिरिक्त मनुष्यबळ परिक्षेत्र कार्यालयात

पोलीस ठाण्यांमधील अतिरिक्त मनुष्यबळ मुंबईतील पाच परिक्षेत्र कार्यालयांमध्ये राखीव ठेवण्याचा विचार सुरू असल्याची माहिती मिळते. असे केल्यास हद्दीतील प्रमुख शासकीय कार्यालये, मोठी रुग्णालये, प्रार्थनास्थळे, संवेदनशील ठिकाणे यांच्या बंदोबस्तासाठी पोलीस ठाण्यांऐवजी परिक्षेत्र कार्यालयातील मनुष्यबळाचा वापर होऊ शकेल. हा निर्णयही परिक्षेत्र कार्यालयाकडून घेतला जाईल. त्यामुळे पोलीस ठाण्यावरील कामाचा ताण आणखी कमी होऊ शकेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *