नालासोपाऱ्यात ११ बांगलादेशींना अटक

दहशतवादविरोधी पथकाने नालासोपारा येथे बुधवारी छापा टाकून बेकायदा राहणाऱ्या ११ बांगलादेशी नागरिकांना अटक केली. नालासोपाऱ्याच्या अनेक भागांत बांगलादेशी नागरिक छुप्या पद्धतीने राहत असल्याचा संशय आहे. मुंबई दहशतवादविरोधी पथकाच्या कारवाईनंतर स्थानिक पोलिसांनीही बांगलादेशी नागरिकांविरोधात मोहीम उघडली आहे.

नालासोपारा पश्चिमेतील टाकी पाडा, गास रोड येथे बुधवारी विक्रोळीच्या दहशतवादविरोधी पथकाने छापा टाकून या बांगलादेशी नागरिकांना अटक केली. या बांगलादेशी नागरिकांकडे बनावट पॅन कार्ड आणि आधारकार्ड असल्याचे समोर आले आहे. एजंटच्या माध्यमातून त्यांनी ही कागदपत्रे बनवली होती. या कारवाईबाबत स्थानिक पोलिसांना अंधारात ठेवण्यात आले होते. या कारवाईनंतर गुरुवारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली आणि त्यांनी नालासोपारा शहरात बांगलादेशी नागरिकांना शोधण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन सुरू करण्याचा निर्णय घेतला. ‘परदेशी नागरिकांना शोधून त्यांना त्यांच्या देशात पाठवण्याची एमआरओ अर्थात फॉरन रजिस्ट्रेशन शाखा जिल्ह्यत कार्यरत आहे. या शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने बांगलादेशी शोधून काढले जाणार आहे. त्यांना आश्रय देणारे, त्यांना बनावट कागदपत्रे बनवून देणाऱ्या दलालांवरही कारवाई होणार आहे,’ असे पोलीस उपअधीक्षक दत्ता तोटेवाड यांनी सांगितले.

नालासोपारा गुन्हेगारांचे माहेरघर?

गेल्या काही वर्षांपासून नालासोपारा शहराचे नाव दहशतवादी, गुन्हेगारी जगताशी जोडले गेलेले आहे. गुन्हेगारांचे माहेरघर अशी नवी ओळख या शहराची होऊ लागली आहे. दाऊद इब्राहिम याचा डावा हात समजला जाणारा आणि मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी करीमुल्ला खान ओसान खान याला नालासोपारा पश्चिमेकडील समेळ पाडा या विभागातून तब्बल १५ वर्षांनी मुंबई गुन्हे शाखेने अटक केली होती. तो राजरोस नालासोपार शहरात राहत होता.२००० साली कानपूर येथे बॉम्बस्फोट करून फरार असलेला आरोपी मोहम्मद असद सिद्धिकी यालाही २५ फेब्रुवारी २०११ रोजी नालासोपारामधील सोपारा गावातून जेरबंद करण्यात आले होते. पुणे बॉम्बस्फोटाचा मुख्य आरोपी यासीन भटकळ हाही नालासोपारा शहरात अनेक वेळा यायचा. त्याच्या इमारती वसई-विरार महापालिकेकडून पाडण्यात आल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *