शनिवार पेठ येथे आईवडिलांची निर्घृण हत्या करुन मुलाने स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रकाश दत्तात्रय क्षीरसागर (वय 60) आणि आशा प्रकाश क्षीरसागर (वय 55) रा 382 शनिवार पेठ अशी हत्या झालेल्या आई वडिलांच्या नावे आहेत. ही घटना बुधवारी (6 डिसेंबर) सकाळी 9. 30 वाजता उघडकीस आली. पराग प्रकाश क्षीरसागर असे मुलाचे नाव असून त्याने आईवडिलांची गळा चिरुन हत्या केल्यानंतर स्वतः च्या हातावर धारदार शस्त्रानं वार करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
स्थानिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन याची माहिती दिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दरम्यान, विश्रामबाग पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी मुलाला ताब्यात घेतले आहे.
‘आरोपी मुलगा मानसिक रुग्ण’
दोघांचीही हत्या केल्यानंतर त्याने स्वतःच्या हातावर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, यातून तो बचावला. 9.30 वाजण्याच्या पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. घटनास्थळी दाखल होत पोलिसांनी परागला ताब्यात घेतले व उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल केले आहे.
