धावत्या लोकलमध्ये १९ वर्षीय तरुणीला शनिवारी रात्री बाराच्या सुमारास लुबाडून लोकलमधून फेकण्याचा धक्कादायक प्रकार घडला. ऋतुजा बोडके असे या तरुणीचे नाव आहे. नेरुळ-जुईनगरदरम्यान महिलांच्या डब्यात ही घटना घडली. चोरटय़ाने ऋतुजाचा मोबाइल, पर्स आणि कानातील रिंगा चोरून नेण्यात आल्या आहेत.
ऋतुजा ही वाशी येथे राहणारी विद्यार्थिनी असून रात्री ११.३० वाजता सीवूडमध्ये ट्रेनमध्ये चढली. मुंबईच्या दिशेला जाणाऱ्या ट्रेनमध्ये लेडीज डब्यात ऋतुजा एकटीच होती. आरोपी सीवूड रेल्वे स्थानकापासून तिचा पाठलाग करीत होता. सीवूड, नेरुळ रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो डब्यात चढल्याचे दिसत आहे. नेरुळ रेल्वे स्थानकात ऋतुजा असलेल्या लेडीज डब्यात आरोपीने प्रवेश करीत तिच्या हातातील मोबाइल आणि पर्स हिसकावली. यानंतर आरोपीने तिच्या कानातील रिंगा ओढण्याचा प्रयत्न केला. या वेळी दोघांमध्ये झटापट झाली. आरोपीने रिंगा खेचत ऋतुजाला गाडीमधून धक्का दिला. या वेळी गाडी जुईनगर रेल्वे स्थानकात प्रवेश करीत होती. गाडीचा वेग कमी झाल्याने ऋतुजाला गंभीर दुखापत झाली नाही.
