प्रख्यात वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांच्यावर एका अज्ञात व्यक्तीने रविवारी संध्याकाळी हल्ला केला. या हल्ल्यात दुखापत झाल्याने सुदर्शन पटनायक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
ओदिशामधील पुरी येथे आंतरराष्ट्रीय वाळूशिल्प महोत्सवाला नुकतीच सुरुवात झाली. या महोत्सवात प्रख्यात वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक सहभागी झाले होते. रविवारी संध्याकाळी गर्दीतून एक तरुण हस्तांदोलनासाठी सुदर्शन पटनायक यांच्याजवळ आला. त्याने हस्तांदोलन केल्यावर पटनायक यांच्या मनगटावरील घड्याळ खेचण्याचा प्रयत्न केला. पटनायक यांनी विरोध दर्शवताच त्या तरुणाने पटनायक यांच्यावर हल्ला केला. यानंतर त्या हल्लेखोराने गर्दीचा फायदा घेत तिथून पळ काढला. मी आणि माझ्या विद्यार्थ्यांनी हल्लेखोराला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथून पळून जाण्यात हल्लेखोराला यश आले, असे पटनायक यांनी माध्यमांना सांगितले.
दरम्यान, पुरीत पाच दिवसांच्या आंतरराष्ट्रीय वाळूशिल्प महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १ डिसेंबर पासून कोणार्क येथील चंद्रभागा किनाऱ्यावर या महोत्सवाला सुरुवात झाली. ओदिशामधील पर्यटन मंत्रालय या महोत्सवाचे आयोजक आहेत. या महोत्सवात एकूण ७० वाळूशिल्पकार सहभागी झाले असून यात १८ महिलांचा समावेश आहे. जर्मनी, मेक्सिको, घाना, सिंगापूर, कॅनडा, स्पेन, श्रीलंका, रशिया या देशांमधील शिल्पकार सहभागी झाले आहेत.
