सुरगाण्यातील भिंतघरची अवस्था
राज्यातील पहिले ‘गुलाबी गाव’ असलेले सुरगाणा तालुक्यातील भिंतघर गाव सध्या सर्वत्र चर्चेत आहे. महिला सक्षमीकरणाचा अनोखा संदेश देणाऱ्या या गावाचा डंका सातासमुद्रापार पोहोचला आहे. देशासह परदेशातील पर्यटकांना या गावाची भुरळ पडली असताना स्थानिक प्रशासन मात्र या उपक्रमाची दखल घेत नसल्याचे विदारक चित्र आहे. या गावात जाण्यास बस देखील उपलब्ध नाही. पर्यटकांना दळणवळणाच्या सोयी सुविधांसह अन्य अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
सुरगाणा तालुक्यातील ९० घरांचे भिंतघर गावाचे अस्तित्व जिल्हा नकाशावर एका नाममात्र बिंदू इतके. बहुतांश आदिवासी वस्ती. गाव पाडय़ांचा परिसर एकत्र येत पाच गावांची मिळून ग्रूप ग्रामपंचायतीत हे गाव समाविष्ट आहे. प्रशासकीय पातळीवर दुर्लक्षित राहिलेले हे गाव गेल्या काही वर्षांपासून आपल्या हक्कासाठी लढत आहे. आदिवासींसाठीच्या योजना, पेसा निधीतून ग्रामस्थांनी सातत्याने पाठपुरावा करत गावात पाणी, रस्ता आदी व्यवस्था उपलब्ध करून घेतली. मात्र आर्थिक विवंचना तसेच बेरोजगारीमुळे परिसरात स्थलांतराचे प्रमाण मोठय़ा प्रमाणावर आहे. याचा अप्रत्यक्ष परिणाम मुला-मुलींच्या शिक्षणावर होत आहे.
मुळात आजही ग्रामीण भागात मुलींचे शिक्षण हा विषय गौण ठरतो. या स्थितीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिंतघरचे शिक्षक जितेंद्र गवळी यांनी पुढाकार घेत पालकांमध्ये शिक्षणाविषयी प्रबोधन केले. गवळी यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे आज गावातील २१ मुले शिकत असून त्यामध्ये नऊ मुली आहेत. मात्र या मुलींना शाळेत नियमित पाठवावे यासाठी गवळी यांनी प्रत्येक घराला गुलाबी रंग देण्याचे ठरवले. त्यासाठी सरकारी निधीचा वापर न करता गावातील लोकांनी एकत्र येत लोकवर्गणीतून गुलाबी गाव करण्याचा संकल्प करत त्याला मूर्तरूप दिले. गावकरी, शिक्षक, विद्यार्थी यांच्या प्रयत्नामुळे राज्यातील पहिले ‘गुलाबी गाव’ म्हणून भिंतघर प्रकाशात आले.
गावाचा नावलौकिक कायम राहावा, यासाठी गावात सकाळी सर्वत्र स्वच्छता करण्यात येते. सडा-रांगोळी करत परिसर सुशोभित करण्यात येतो. गाव परिसरात ५०० हून अधिक झाडे लावत त्या झाडांची नावांचे फलक लावण्यात आले आहे. कचरा संकलित करत त्यापासून खत तयार करण्यात येते. हे खत सेंद्रीय शेतीसाठी वापरण्यात येते. शाळाही ‘संगणकीकृत’ झाली. गावाचे हे बदललेले रूप पाहून मुलेही खूश असून शाळेत नियमित येत आहे. दरम्यान, गावाची दिवसागणिक वाढणारी प्रसिद्धी पाहता वेगवेगळी महिला मंडळे, राज्यातील शाळांच्या शैक्षणिक सहली असा पर्यटकांचा राबता परिसरात कायम आहे. मात्र या ठिकाणी पोहचण्यात पर्यटकांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. गावापर्यंत जाण्यासाठी थेट बस नाही. खासगी वाहनांच्या मदतीने या ठिकाणी पोहचता येते.
गावात खाद्यगृह नसल्याने खाद्यपदार्थ वा पाणी मिळणे अवघड होते. पर्यटकांना या गावाची भुरळ पडली असताना स्थानिक प्रशासन मात्र या उपक्रमाची दखल घेत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
पर्यटकांना भेडसावणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन गावातील काही महिलांनी बचत गट स्थापन करत या ठिकाणी आदिवासींचे पारंपरिक खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्याचा विचार आहे. तसेच सेंद्रीय पद्धतीने पिकणाऱ्या तांदळाचे विपणन करत स्थानिकांना रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी विचार सुरू आहे.
– जितेंद्र गवळी (शिक्षक)
