कुत्र्याला जीवे मारले; डॉक्टरसह महिलेवर गुन्हा

नऊ वर्षांपूर्वी घेतलेला पाळीव कुत्रा लहान मुलांना त्रास देऊ लागल्यामुळे एका डॉक्टराच्या सल्ल्याने विषारी औषध देऊन त्याला जीवे मारल्याचा प्रकार हडपसर येथील अॅमोनोरा पार्क परिसरात घडला. या प्रकरणी एका महिलेसह प्राण्यांच्या डॉक्टरवर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पद्मिनी पीटर स्टंप (वय ५९, रा. गुरूनानगक नगर, शंकरशेठ रोड) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून वरुणा सक्सेना (रा. अॅमोनोरा पार्क, हडपसर) आणि डॉक्टर कपिल जयकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टंप यांची मिशन पॉसिबल नावाची भटके व पाळीव प्राण्यांना सांभाळणारी स्वयंसेवी संस्था आहे. या संस्थेत कुत्र्यांचा सांभाळ करून चांगल्या कुटुंबीयांना दत्तक दिले जाते. ऑगस्ट २०१७मध्ये सक्सेना त्यांच्याकडे आल्या. त्यांच्याकडे नऊ वर्षांपूर्वी घेतलेली लिया नावाची कुत्री असून ती सध्या मुलांना त्रास देत असल्याचे सांगितले. त्यामुळे लिया ही कुत्री संस्थेत ठेऊन दुसरी कुत्री दत्तक घ्यायची असल्याचे तक्रारदारांना सांगितले. त्या महिलेस साशा नावाची लॅब्रोडर नावाची कुत्री दत्तक म्हणून दिली.

काही दिवसांनी स्टंप यांनी लिया कुत्रीला मुंबई येथील एका कुटुंबीयांना दत्तक दिली. सक्सेनांना हे समजल्यावर परवानगीशिवाय कुत्री कशी दत्तक दिली, अशी विचारणा केली. त्यामुळे त्यांनी तिची कुत्री परत दिली.

दोन दिवसांपूर्वी स्टंप यांना मैत्रिणीचा फोन आला. लियाला सक्सेनाच्या घरातून लवकर घेऊन जाण्यास सांगितले. घेऊन न गेल्यास ती लवकरच जीवे मारेल असे सांगितले. त्यावेळी स्टंप यांनी यांनी एक दिवसांची मुदत मागितली. पण, नंतर लियाला विषारी औषध देऊन मारून टाकल्याचे समजले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *