लातूरमध्ये बलात्कार पीडित मुलीला शाळेतून काढले

बलात्कार पीडित मुलीला शाळेतून काढण्याचा धक्कादायक प्रकार लातूरमध्ये घडला आहे. आम्हाला आमच्या शाळेची प्रतिष्ठा जपायची आहे असे कारण शाळा प्रशासनाने दिले. १५ वर्षांच्या पीडित मुलीवर सैन्य दलात कार्यरत असलेल्या एकाने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे.

माझ्या शाळेने माझा प्रवेश रद्द केला आहे. यासाठी शाळेने त्यांच्या प्रतिष्ठेचे कारण दिले आहे. तू आमच्या शाळेत शिकलीस तर इतर विद्यार्थ्यांवर आणि शाळेच्या वातावरणावर त्याचा चांगला परिणाम होणार नाही असे शाळेने म्हटल्याचा आरोप या मुलीने केला आहे.

दरम्यान बलात्कार पीडित मुलीच्या काकांनी पोलिसांवरही आरोप केले आहेत. पोलिसांनी बलात्कार प्रकरणात गुन्हा नोंदवून घेण्यासाठी ५० हजार रूपयांची लाच मागितली असा आरोप त्यांनी केला. या सगळ्या प्रकारानंतर पीडितेने तिच्या पालकांसह पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. ज्यानंतर या पीडितेची तक्रार दाखल करण्यात आली आणि गुन्हा दाखल झाला अशीही माहिती समोर आली आहे. या मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तसेच गुन्हाही नोंदवण्यात आला आहे.

आपल्या देशात असो किंवा राज्यात असो महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीरच आहे. या मुलीला आलेला हा अनुभव निश्चितच निषेधार्ह आहे. बलात्कार झाला म्हणून प्रतिष्ठा धुळीला मिळते असे कारण देत शाळेने या मुलीचा प्रवेशच रद्द केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *