पुण्यातील येरवडा येथे रिक्षात झोपलेल्या दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील नागपूर चाळ परिसरात एका आसनी रिक्षेत तीन बहिणी झोपल्या होत्या. तेव्हा एका नराधमाने दोन बहिणींवर लैंगिक अत्याचार केले. मात्र, तिसऱ्या मुलीवर लैंगिक अत्याचार करत असताना तिने आरडाओरडा केला. तिचा आवाज ऐकून मुलींचे वडील त्या ठिकाणी आले. तेव्हा हा सर्व प्रकार समोर आला. या घटनेनंतर येरवडा पोलिसांना तात्काळ आरोपीला अटक केली. मात्र, या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा येथील नागपूर चाळ परिसरात मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास भवरलाल सखाजी रांगे (वय ४५, रा. संजय पार्क, लोहगाव विमानतळ रास्ता मूळ रा. राजस्थान ) या नराधमाने मुलींवर लैंगिक अत्याचार केले. या तीनही बहिणी अनुक्रमे आठ, चार आणि नऊ वर्षांच्या आहेत. मंगळवारी रात्री त्या रिक्षेत झोपल्या असताना भवरलाल रांगे याने हे नीच कृत्य केले. या नराधमाने सुरूवातीला तिघींपैकी चार आणि आठ वर्षांच्या बहिणींवर अत्याचार केले. त्यानंतर ९ वर्षांच्या तिसऱ्या बहिणीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला असता तिने आरडाओरडा केला. तेव्हा मुलीचे पालक त्या ठिकाणी आले आणि तिने हा प्रकार आपल्या पालकांना सांगितला. मुलींच्या पालकांनी तात्काळ येरवाडा पोलीस ठाण्यात धाव घेत या घटनेची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
