दिवाळीच्या सुट्टीत प्रवाशांच्या विशेष सोयीसाठी सुरू केलेली पुणे-गोरखपूर अनारक्षीत (जनरल) विशेष गाडी रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे सुमारे २८ तासापेक्षाही जास्त उशिराने पुण्यात पोहोचली. विशेष म्हणजे या गाडीवर पाटीही नसल्याने अगदीच नगण्य प्रवासी घेऊन जवळ जवळ मोकळीच धावत आहे.
रेल्वे प्रशासनाने जारी केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे गाडी क्रं. ०१४५४ गोरखपूरहून पुण्यात बुधवारी संध्याकाळी पाच वाजता येणे अपेक्षित होते. पण ही गाडी गुरुवारी रात्री साडे नऊ वाजता पुण्यात आली. म्हणजे सुमारे २८ तासापेक्षाही जास्त उशीराने धावली आहे. यामुळे गाडी तील प्रवासी अशरश: वैतागले होते.
अशाच प्रकारे पुण्यातून या गाडीची (०१४५३) सुटण्याची वेळ दर रविवारी संध्याकाळी ७.५० वाजता आहे. तरीही पुण्यातून सुटताना या गाडीला मागील दोन रविवारी अनुक्रमे साडे पाच तास (म्हणजेच सोमवारी मध्यरात्री १.२० वा.) व साडे सात तास (पहाटे ३.२०) असा उशीर झाला होता. ही गाडी विशेष गाडी असल्याने पुणे अथवा गोरखपूरहुन उशीरा सुटली तरी मधल्या प्रवासात हिचा वेग वाढवून किंवा थांब्यावर कमी वेळ थांबा घेऊन वेळेची बचत करता येणे शक्य आहे. पण प्रशासन नेमकी उलट भूमिका घेऊन मधल्या टप्प्यात गाडीस अजूनच उशीर करत आहे. काही महत्त्वाच्या स्थानकांमध्ये ही गाडी तास दोन थांबवून ठेवण्यात येऊन इतर गाड्या पुढे सोडण्यात येते. ही गाडी हॉलिडे स्पेशल असल्याने सापत्न वागणूक मिळत असल्याचे प्रवाशांचे मत आहे.