सरकारने अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ४.५० रूपयांनी वाढ केली आहे. विनाअनुदानित सिलिंडरचे दरही वाढवण्यात आले आहेत. आता विनाअनुदानित सिलिंडरसाठी ९३ रूपये जास्त द्यावे लागणार आहेत. त्याचबरोबर जेट इंधनच्या किंमतीतही २ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. यामुळे गृहिणींचे महिन्याचे बजेट आणि विमानाचे तिकीट दोन्ही महाग होणार आहेत. जुलै २०१६ नंतर सरकारने १९ वेळा सिलिंडरच्या किंमतीत वाढ केली आहे. सरकारच्या या निर्णयावर यापूर्वीही विरोधी पक्षांनी टीका केली होती. परंतु, कोणत्याही परिस्थितीत गॅस सिलिंडरवर देण्यात येणारे अनुदान सुरू ठेवणार नसल्याचे सरकारच्या भूमिकेवरून स्पष्ट होते.
गेल्यावर्षी जुलैमध्ये सरकारने प्रत्येक महिन्यात किंमत वाढवून गॅस सिलिंडरवर देण्यात येणारे अनुदान संपवण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून आतापर्यंत १९ वेळा किंमतीत वाढ करण्यात आली आहे. आता घरगुती अनुदानित १४.२ किलोग्रॅमचा एक सिलिंडर ४९५.६९ रूपयांना मिळेल. विनाअनुदानित सिलिंडरच्या किंमतीत ९३ रूपयांची वाढ होऊन त्याची किंमत आता ७४२ रूपये इतकी झाली आहे. यापूर्वी एक ऑक्टोबर रोजी यामध्ये ५० रूपयांची वाढ करून त्याची किंमत ६४९ रूपये इतकी नेण्यात आली होती.
गेल्या वर्षी सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांना प्रत्येक महिन्यात दरांमध्ये वाढ करण्यास सांगितले होते. पुढील मार्च महिन्यापर्यंत अनुदान संपवण्यासाठी सरकारने या सूचना केल्या होत्या. हे धोरण अवलंबण्यास सुरूवात केल्यापासून अनुदानित सिलिंडरच्या दरात आतापर्यंत ७६.५१ रूपयांची वाढ झाली आहे. जून २०१६ मध्ये याची किंमत ४१९.१८ इतकी होती.
सरकारी पेट्रोलियम कंपन्या प्रत्येक महिन्याच्या एक तारखेस एलपीजी आणि एटीएफ (विमान इंधन) किंमतीत बदल करतात. मागील महिन्यातील तेलाची सरासरी किंमत आणि विदेशी मुद्रा विनिमय दरावर हे अवलंबून असते.