पाकिस्तानमध्ये मानवतेला काळिमा फासणारी एक घटना घडलीय. भावानं प्रेम केलं म्हणून त्याची शिक्षा बहिणीला दिली गेली… ही शिक्षा म्हणजे या बहिणीला निर्वस्र करून संपूर्ण गावभर फिरवण्यात आलं.
आपल्या भागातील एका मुलीशी संबंधित मुलीच्या भावाचे प्रेमसंबंध होते. हे संबंध प्रेयसीच्या कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी प्रियकराच्या बहिणीलाच संपूर्ण गावासमोर निर्वस्र करून तिची धिंड काढली.
बऱ्याचदा मानवाधिकाराचा राग आळवणाऱ्या पाकिस्तानमध्ये घडलेल्या या घटनेनं मानवतेला मान खाली घालायला भाग पाडलंय.
पोलिसांत तक्रीर दाखल केल्यानंतर कारवाई करत सात लोकांना अटक करण्यात आलीय. तर दोन मुख्य आरोपी अजूनही फरार आहेत.
पाकिस्तानच्या या भागात आपल्या मर्जीनं विवाह करू इच्छिणाऱ्या मुलींची हत्या करण्याचा प्रघातच पडलाय. आपल्या खोट्या प्रतिष्ठेपायी दरवर्षी जवळपास १००० मुलींची हत्या होत असल्याचं आकडेवारीतून दिसून येतंय.
याबद्दल पाकिस्तान सरकार आणि पोलीस प्रशासन मूक गिळून गप्प आहे.