नवाजचा माफीनामा; आत्मचरित्रही मागे घेतलं!

शरीरसंबंधांबाबतच्या गौप्यस्फोटामुळं वादग्रस्त ठरलेलं ‘अॅन ऑर्डिनरी लाइफ’ हे आत्मचरित्रपर पुस्तक अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीनं अखेर मागं घेतलं आहे. तसंच, या पुस्तकामुळं जे कुणी दुखावले गेले आहेत, त्यांची माफी मागतो,’ असंही त्यानं स्पष्ट केलं आहे. एका ट्विटच्या माध्यमातून नवाजनं आत्मचरित्रात लिहिलेल्या खासगी गोष्टींबद्दल पश्चात्ताप व्यक्त केला आहे.

उत्तम अभिनयाच्या जोरावर अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये बस्तान बसवलेल्या नवाजचं आत्मचरित्र नुकतंच प्रकाशित झालं आहे. या पुस्तकात त्यानं मॉडेल, अभिनेत्री निहारिक सिंह हिच्यासोबतच्या अफेअरविषयी लिहिलं आहे. निहारिकासोबत माझे शरीरसंबंध आले होते, असंही त्यानं पुस्तकात म्हटलं आहे. त्यावरून प्रचंड गदारोळ सुरू आहे. निहारिका सिंहनं नवाजचे सर्व दावे फेटाळत त्याच्यावर टीकेची झोड उठवली होती. स्वस्तातल्या प्रसिद्धीसाठी नवाज एका महिलेची बदनामी करत आहे, असा आरोप तिनं केला. तर, दिल्लीतील एका वकील गौतम गुलाटी यांनी नवाजविरोधात राष्ट्रीय महिला आयोगाकडं धाव घेतली होती.

हे प्रकरण जड जाण्याची शक्यता असल्याचं दिसताच नवाजनं माफी मागून सुटका करून घेतली आहे. आता निहारिका सिंह व गौतम गुलाटी काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *