बनारस हिंदू विद्यापीठातील मुख्य पर्यवेक्षकांचा राजीनामा

बनारस हिंदू विद्यापीठातील (बीएचयू) विद्यार्थिनीच्या छेडछाडीनंतर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या घटनेचे पडसाद आता उमटू लागले आहेत. विद्यापीठातील मुख्य पर्यवेक्षक (प्रॉक्टर) ओ. एन. सिंह यांनी या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी मंगळवारी रात्री उशिरा राजीनामा दिला असून कुलगुरू जी. सी. त्रिपाठी यांनी तो मंजूर केला आहे. दरम्यान, कुलगुरूंवरही कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

या प्रकरणी आता वसतिगृहाच्या वॉर्डनवरही कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

उशिरा रात्रीपर्यंत वसतिगृहाबाहेर राहिल्यास छेडछाड होणारच असे बेजबाबदार वक्तव्य त्यांनी केले होते. त्यामुळे त्यांनाही पदावरून हटवले जाऊ शकते, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे काल, मंगळवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले होते. तसेच राज्य सरकार या घटनेचा अहवाल केंद्र सरकारला लवकरच सादर करणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली होती.

त्याआधी दिल्लीत कार्यकारी मंडळाच्या बैठकीतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यासंबंधी चर्चा झाली. या बैठकीला कुलगुरू त्रिपाठीही उपस्थित होते. सुरक्षाविषयक जुने नियम बदलण्यात यावेत, तसेच अशा घटनांमध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, असा निर्णय घेण्यात आला. वाराणसीचे विभागीय आयुक्त गोकर्ण यांनीही या घटनेचा अहवाल मुख्य सचिवांकडे सोपवला होता. या घटनेला विद्यापीठ प्रशासन जबाबदार असल्याचा ठपका त्यांनी ठेवला होता. पीडितेने केलेली तक्रार संवेदनशीलपणे हाताळली नाही, असे या अहवालात नमूद केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *