राज्यात कोसळधार; कोकणासह कोल्हापूर, साताऱ्याला पावसानं धुतलं

मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली असताना कोकण किनारपट्टीवरही पावसाची दमदार बॅटिंग सुरु आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या तुफान पाऊस सुरु आहे. याशिवाय पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सांगलीतही पावसाचा जोर कायम आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जबरदस्त पाऊस झाला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यामधील माणगाव-आंबेरी पुलावर मंगळवारी सकाळपासूनच पावसाचे पाणी साचले होते. त्यामुळे माणगाव खोऱ्यातील २७ गावांचा संपर्क तुटला होता. जिल्ह्यातील पावसाचा जोर अद्याप कायम आहे. याशिवाय रायगड आणि रत्नागिरीतही पावसाची संततधार सुरु आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागांमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात कालपासूनच जोरदार पाऊस बरसतो आहे. दापोलीतील पाजच्या समुद्र किनारी काही बोटी बुडाल्याची घटना घडलीदेखील काल घडली आहे.

पुण्यातही काल दिवसभर मुसळधार पाऊस झाला. मात्र आज पावसाचा जोर ओसरला आहे. काल झालेल्या पावसामुळे खडकवासला धरणातून २३ हजार क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. कोल्हापूर, सातारा, सांगलीतही जोरदार पाऊस झाला आहे. कोल्हापुरात तुफान पाऊस झाल्याने राधानगरी धरणाचे ७ दरवाजे उघडण्यात आले. त्यामधून १२ हजार क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. साताऱ्यावरही वरुणराजाची कृपादृष्टी झाली आहे. त्यामुळे पाचगणी, महाबळेश्वर, कोयना परिसरात दमदार पाऊस झाला आहे. मुसळधार पावसामुळे कोयना धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे. धरणातील पाणीसाठा दीड टीएमसीने वाढला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *