कर्जतमधील ओढ्यात आढळला महिलेचा मृतदेह, संपत्तीच्या वादातून खून?

नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील एका ओढ्यात महिलेचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अलका दशरथ राऊत (वय ५०, रा. आंबीजळगाव) असे मृत महिलेचे नाव असून, संपत्तीच्या वादातून तिचा खून करण्यात आला असावा, अशी शक्यता स्थानिक नागरिकांनी वर्तविली आहे. आंबीजळगाव गावापासून सुमारे ५ किमी अंतरावर असणाऱ्या खतगाव शिवारातील ओढ्यात एका शेतकऱ्याला सोमवारी पोते तरंगताना दिसले. या पोत्यातून पाय बाहेर आल्याचे दिसल्यावर शेतकऱ्याने कर्जत पोलिसांना त्याबद्दल माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पुण्याला पाठवला आहे. या प्रकरणी अज्ञाताविरोधात कर्जत पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वादामुळे गेल्या अनेक वर्षांपासून मृत महिला तिच्या पतीपासून विभक्त झाली होती. आणि ती माहेरी वडिलांच्या घरी राहात होती. महिलेला दोन मुली असून, दोघींची लग्न झाली आहेत. संबंधित महिलेचे गावात कोणाशीही वैर नव्हते. तिच्या नावावर कोणतीही संपत्ती नसली तरी तिच्या वडिलांच्या नावावर असलेल्या संपत्तीवर डोळा ठेऊन कोणीतरी तिची हत्या केली असावी, अशी चर्चा परिसरात सुरु आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, अद्याप याप्रकरणी कोणताही सुगावा पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *