महर्षी वाल्मिकींबद्दल आक्षेपार्ह विधान करणं अभिनेत्री राखी सावंतला चांगलंच महागात पडलं आहे. लुधियाना येथील न्यायालयानं तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. तसंच तिच्या अटकेचे आदेशही दिले आहेत. दरम्यान, या प्रकरणी पुढील सुनावणी ५ सप्टेंबरला होणार आहे.
जिल्हा सत्र न्यायालयानं ५ ऑगस्टला राखीला सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. तसंच ७ ऑगस्ट रोजी न्यायालयात शरण यावं, असं म्हटलं होतं. पण राखी सावंत न्यायालयात हजर राहू शकली नाही. राखी अमेरिकेत असल्याचं तिच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं. जामिनासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी विनंतीही वकिलांनी राखीच्या वतीनं जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश गुरबीर सिंग यांच्याकडे अर्जाद्वारे केली आहे. मात्र, न्यायालयानं तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावत तिच्या अटकेचे आदेश दिले आहेत.
राखी सावंतच्या वक्तव्यानं वाल्मिकी समाजाच्या भावना दुखावल्यानं वकील नरिंदर आदित्य यांनी ९ जुलै २०१६ रोजी तिच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. राखीनं वाल्मिकी समाजाची बिनशर्त माफी मागावी, असंही त्यांनी म्हटलं होतं. एका मुलाखतीमध्ये राखीने वाल्मिकींचा उल्लेख ‘मारेकरी’ म्हणून केला होता. या प्रकरणी अॅड. नरिंदर आदिया यांनी राखीविरोधात तक्रार दाखल केली होती. ‘मला कोणाच्याही भावनांना दुखवायच्या नव्हत्या. कोणाच्या भावना दुखावल्या असल्यास त्यांची माफी मागते,’ असं राखीनं म्हटलं होतं.
