रात्री उशिरापर्यंत यंत्रांच्या घरघराटाने नौपाडावासीय हैराण
नौपाडा परिसरातील अरुंद रस्त्यावर उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलांच्या कामामुळे परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न बिकट होत असतानाच, आता या पुलाच्या बांधकामाने स्थानिकांची झोप उडवली आहे. गेल्या काही महिन्यांपासून रात्री उशिरापर्यंत या पुलाच्या उभारणीची कामे सुरू असल्याने यंत्रांच्या आवाजाने नौपाडावासीयांची झोपमोड होऊ लागली आहे. स्थानिक रहिवाशांनी याबाबत तक्रारी करूनदेखील पालिका प्रशासन व स्थानिक पोलिसांकडून काहीही हालचाल करण्यात आलेली नाही.
ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नौपाडय़ासह अल्मेडा आणि मीनाताई ठाकरे या चौकांमध्ये पालिकेच्या वतीने उड्डाणपूल उभारणीची कामे सुरू आहेत. हे काम करत असताना ठेकेदाराकडून पुरेशी दक्षता घेतली जात नसल्याच्या तक्रारी असून यामुळे या भागातील वाहतूक कोंडी वाढू लागली आहे. त्यातच आता या पुलाचे बांधकाम रहिवाशांची झोप उडवत आहे.
नौपाडय़ातील पुलाचे काम गेल्या काही महिन्यांपासून दिवस-रात्र अशा दोन्ही वेळेत करण्यात येत आहे. हे काम झटपट पूर्ण व्हावे यासाठी ठेकेदाराकडून वेगाने काम केले जात असले तरी स्थानिकांसाठी मात्र ही डोकेदुखी ठरू लागली आहे. रात्री उशिरा काम करताना कामगारांचे जोरजोरात ओरडणे, क्रेनचा आवाज, लोखंड उचलताना व ठेवताना होणारा कर्कश आवाज, हातोडीचा आवाज यामुळे नौपाडय़ातील रहिवाशांची रात्रीची झोप उडाली आहे, अशी माहिती स्थानिक रहिवाशी उदय मोरे यांनी दिली. दरम्यान, याप्रकरणी महापालिकेचे मुख्य अभियंता रतन अवसरमोल यांच्याशी संपर्क साधला असता, याप्रकरणी तक्रार प्राप्त झालेली नाही, असे त्यांनी सांगितले. रहिवाशांना त्रास होत असेल तर रात्रीच्या वेळेत काम बंद ठेवण्याच्या सूचना ठेकेदारास दिल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ध्वनी प्रदूषणाकडे दुर्लक्ष
नौपाडय़ातील उड्डाणपुलाच्या कामासाठी रात्रीच्या वेळेस येथील एक मार्गिका पूर्णपणे बंद करण्यात येते. त्यामुळे स्थानिकांना घरी जाताना त्रासाला सामोरे जावे लागते. या पुलाचे काम दिवसाप्रमाणेच रात्रीच्या वेळेसही सुरू ठेवण्यात येते. रात्री ११ पासून सुरू होणारे काम सकाळ होईपर्यंत सुरूच असते. त्यामुळे दिवसभर पुलाच्या कामामुळे होणारा कर्कश आवाज आता रात्रीही सहन करावा लागत आहे. न्यायालयाने नागरी वस्तीमध्ये ध्वनी प्रदूषणासंबंधी काही नियम आखून दिले आहेत, मात्र त्याकडे ठेकेदाराचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. या ध्वनी प्रदूषणाची दखल नौपाडा पोलिसांकडूनही घेतली जात नाही, असा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला.
