बॉलिवूडमध्ये ‘मासूम’ चित्रपटाने पदार्पण करणारा अभिनेता इंदर कुमार याचे गेल्या शुक्रवारी वयाच्या ४४ व्या वर्षी निधन झाले. मध्यरात्री झोपेतच त्याचे निधन झाल्याचे म्हटले जाते. त्याची पत्नी पल्लवी हिने दिलेल्या माहितीनुसार डॉक्टरांनी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाल्याचे म्हटले. गेल्या काही दिवसांपासून इंदर सोशल मीडियावर तितकासा सक्रिय नव्हता. तत्पूर्वी त्याने इन्स्टाग्रामवर एक मेसेज पोस्ट केला होता.
इन्स्टाग्रामवर इंदरने २७ जुलैला म्हणजेच निधनाच्या आदल्या दिवशीच ६ वाजून २८ मिनिटांनी शेवटचा मेसेज पोस्ट केला होता. या पोस्टमध्ये त्याने स्वतःचा एक फोटो शेअर करत ‘शांती’ ( Peace ) असे लिहिले होते. त्याची ही पोस्ट पाहिल्यानंतर इन्स्टाग्रामवर त्याला फॉलो करणारे त्याचे चाहते आणि मित्र परिवार यांना धक्का बसला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याच्या निधनाचे वृत्त आल्याने इंदरला आधीच त्याच्या मृत्यूची चाहूल लागल्याचे समोर आले. यावर आधी कोणाचाच विश्वास बसत नव्हता.
