पराभवानंतर कर्णधार मिताली राजने जाहीर केला मोठा निर्णय

विश्वचषकाच्या अंतिम लढती हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला गेल्यानंतर भारताची माजी कर्णधार मिताली राज हिने क्रिकेट कारकिर्दीतील पुढील वाटचालीबाबतचा मोठा निर्णय जाहीर केला आहे. ही आपली शेवटची क्रिकेट विश्वचषक स्पर्धा होती. आता पुढच्या विश्वचषकात मी भारतीय संघाचा भाग नसेन असे मितालीने सामना संपल्यानंतर सांगितले.
अंतिम लढतीनंतर मिताली म्हणाली, “ही माझी शेवटची विश्वचषक स्पर्धा होती. आता पुढच्या विश्वचषकात मी भारतीय संघाचा भाग नसेन” मात्र असे असले तरी मितालीने कर्णधारपद सोडण्याबाबत वा निवृत्ती स्वीकारण्याबाबत कोणताही मोठा निर्णय घेतला नाही.
यावेळी अंतिम लढतीत झालेल्या पराभवाचे विश्लेषण करताना तिने सांगितले की, सामन्यातीत बहुतांश वेळ दोन्ही संघांना समान संधी होती. पण महत्त्वाच्या क्षणी भारतीय संघाने पाठोपाठ विकेट्स गमावल्या. त्यामुळे आम्हाला पराभव पत्करावा लागला.” मात्र संपूर्ण स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करणाऱ्या आपल्या संघाचे तिने कौतुक केले.
भारताचे विजयाचे स्वप्न भंगले
महिला विश्वचषकात स्वप्नवत कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला संघाचे विश्वचषकाला गवसणी घालण्याचे स्वप्न अखेर भंगले. मिताली राजच्या भारतीय संघाला अंतिम लढतीत इंग्लंडकडून 9 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. भारतावर मात करत इंग्लंडने विजेतेपदाला गवसणी घातली. महिला विश्वचषकातील इंग्लंडचे हे चौथे विश्वविजेतेपद आहे.
   संपूर्ण सामन्यात वर्चस्व गाजवल्यानंतरही अखेरच्या काही षटकांत फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे भारतीय महिला क्रिकेट संघावर हातातील विश्वविजेतेपद गमावण्याची वेळ आली. प्रथम फलंदाजी केलेल्या यजमान इंग्लंडला ५० षटकात ७ बाद २२८ धावांवर रोखल्यानंतर, भारताचे प्रयत्न ९ धावांनी कमी पडले. मुंबईकर पूनम राऊतने केलेली ८६ धावांची झुंजार खेळीही भारताचे विश्वविजेतेपद साकारु शकली नाही. अन्या श्रुबसोल हिने ४६ धावांत ६ बळी घेत भारताच्या हातातील विश्वविजेतेपद हिसकावून घेतले. भारताचा डाव ४८.४ षटकात २१९ धावांत संपुष्टात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *