‘इस्रो’चे माजी अध्यक्ष यू. आर. राव यांचे निधन

‘इस्रो’चे माजी अध्यक्ष प्रोफेसर यू आर राव (Udupi Ramachandra Rao)  यांचे निधन झाले आहे. वयाच्या 85 व्या वर्षी राव यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या आजाराने ते त्रस्त होते. उपचारांसाठी प्रोफेसर राव यांना हॉस्पिलटमध्ये दाखल करण्यात आले होते. रविवारी उपचारादरम्यानच रात्री उशीरा 2.30 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  यू.आर.राव यांचा या वर्षी पद्म विभूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता.

  • प्रोफेसर राव यांना 1972 साली भारतात उपग्रह तंत्रज्ञानाच्या स्थापनेची जबाबदार घेतली होती. उडुपी रामचंद्र राव यांचा जन्म कर्नाटकातील अदमारू या खेडेगावात 10 मार्च 1932 रोजी एका सर्वसामान्य कुटुंबात झाला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण म्हैसूरमध्ये पूर्ण झाले. त्यानंतर मद्रासला विज्ञानात पदवी, बनारस हिंदू विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी व गुजरात विद्यापीठातून त्यांनी पीएच.डी. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. नंतर ते अवकाशयानांच्या अभ्यासासाठी अमेरिकेला गेले होते.
    अमेरिकेतील एमआयटी संस्थेत शिक्षण घेतल्यानंतर डलास येथील टेक्सास विद्यापीठात अध्यापन केले. 1966 मध्ये भारतात परत येऊन अहमदाबादच्या फिजिकल रीसर्च लॅबोटरीत ते संशोधन करू लागले. तेथे डॉ. विक्रम साराभाई यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले.
    – प्रोफेसर राव यांचा आंतरराष्ट्रीय अॅस्ट्रोनॉटिकल फेडरेशननं प्रतिष्ठित ‘द 2016 आईएएफ हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश केला होता.
    – राव यांच्या मार्गदर्शनांतर्गत 1975मध्ये पहिला भारतीय उपग्रह आर्यभट्टपासून 20 हून अधिक उपग्रहांचं डिझाईन तयार करण्यात आले, उपग्रहाची निर्मिती करण्यात आली व अंतराळात प्रक्षेपितही करण्यात आले.
    – 2013 मध्ये वॉशिंग्टन येथे ‘सॅटेलाइट हॉल ऑफ फेम ऑफ द सोसायटी ऑफ सॅटेलाइट प्रोफेशनल्स इंटरनॅशनल’ या संस्थेत समावेश झालेले ते पहिले भारतीय आहेत.
    – 1984 ते 1994 या काळात त्यांनी देशाच्या अवकाश कार्यक्रमाचे नेतृत्व केले. दहा वर्षे ते अवकाश खात्याचे सचिव व इस्रोचे अध्यक्ष होते.
    – ‘आर्यभट्ट’नंतर त्यांच्या नेतृत्वाखाली ‘भास्कर’, ‘अ‍ॅपल’, ‘रोहिणी’, ‘इन्सॅट’ आदी श्रेणींचे किमान वीस उपग्रह तयार झाले.
    – अंतराळ क्षेत्रातील राव यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबाबत 1976 साली त्यांचा पद्म भूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला.  तर 2017 मध्ये पद्म विभूषण पुरस्कारानं राव यांना गौरवण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *